|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळला संतप्त नागरिकांचा रास्तारोको

कुडाळला संतप्त नागरिकांचा रास्तारोको 

कुडाळ : कुडाळ-नेरुरपार-मालवण मार्गावरील गटाराचे बांधकाम करण्यासाठी जेसीबीने खोदाई करताना कुडाळ शहरातील इंद्रप्रस्थनगर, नाबरवाडी, गणेशनगर व केळबाईवाडीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून चार दिवस झाले, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराने तिची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे त्या भागातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे संतप्त नागरिक व काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी सकाळी कुडाळ-मालवण रस्ता रोखून धरत आंदोलन छेडले.

सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे साहित्य आणून काम सुरू करतो, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पाऊण तास बंद राहिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिक, नगरसेवक व अधिकारी यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पेले.

रस्त्यालगत गटार नसल्याने गटार खोदाई करून त्याचे आरसीसी बांधकाम मंजूर झाले आहे. ते काम करण्यासाठी ठेकेदाराने रविवारी रात्री गटारासाठी खोदाई करण्याचे काम हाती घेतले. खोदाई करण्यापूर्वी नळयोजना, दूरध्वनी केबल कुठे आहे, याची खात्री न करता कामाला सुरुवात केल्याने पोस्ट कार्यालय तिठा ते थेट इंद्रप्रस्थनगर रस्त्यादरम्यान शंभर ते सव्वाशे मीटर लांबीची जलवाहिनी फोडण्यात आली. त्यामुळे त्या भागातील पाणीपुरवठा बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली. दोन दिवसांत ती दुरुस्त करून देण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी दिले. मात्र, त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्षच दिले नाही. चार दिवस झाले, तरी दुरुस्ती झाली नाही व पाणीपुरवठाही झाला नाही

 

                                                                    नागरिक आक्रमक

चार दिवस नळयोजनेचे पाणी न आल्याने इंद्रप्रस्थनगर परिसरातील नागरिक सकाळी रस्त्यावर उतरले. त्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना बोलावून आमची पाण्याची सोय कधी करता? असा सवाल केला. नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेवक ओंकार तेली, संध्या तेर्से, साक्षी सावंत, अश्विनी गावडे तसेच दीपक कुडाळकर, सर्फराज नाईक यांच्यासह नागरिक व महिला मोठय़ा संख्येने जमा झाल्या. नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना याबाबत कल्पना दिली. अधिकाऱयांना नागरिकांसह नगरसेवकांनी धारेवर धरले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले. अधिकाऱयांकडून ठोस निर्णय मिळत नसल्याने नागरिक व काँग्रेस नगरसेवकांनी रस्ता रोखून धरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. छोटी वाहने दुसऱया बाजूने गेली. मोठय़ा वाहनांचा मात्र खोळंबा झाला.

                                                                    पोलीस दाखल

कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार सहकाऱयांसह तेथे आले. पोलिसांनी अधिकाऱयांशी चर्चा केली. अखेर सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिले. काम सुरू झाले नाही, तर पुन्हा रास्तारोकोचा इशारा नागरिकांनी दिला.

             नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर कारवाई

कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, काँग्रेसच्या नगरसेविका संध्या तेर्से, सुनील बांदेकर, ओंकार तेली, साक्षी सावंत, अश्विनी गावडे तसेच सर्फराज नाईक यांच्यावर पोलिसांनी कलम 68 व 69 प्रमाणे कारवाई केली. त्यांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडून देण्यात आले.

खोदाई करताना ठेकेदाराकडून खबरदारी नाही

गटारासाठी जेसीबीने खोदाई करताना बांधकाम विभाग तसेच नगर पंचायत, दूरध्वनी या खात्यांशी संपर्क साधून जलवाहिनी, केबलबाबत खातरजमा करणे आवश्यक असते. मात्र, या कामाचे पोटठेकेदार असलेले नगरसेवक अभय शिरसाट यांनी याबाबत कोणतीही दक्षता न घेता खोदाई केली. त्यामुळे जलवाहिनी फुटली. दिवसा हे काम केले असते, तर जलवाहिनी फुटल्यानंतर लक्षात आले असते. संपूर्ण वाहिनी फुटली नसती. नगरसेवकाने खरं तर खबरदारी घेणे आवश्यक असताना ती घेतली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली