|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » एसबीआयची लवकरच डिजि बँक

एसबीआयची लवकरच डिजि बँक 

पेपरलेस बँक शाखा : सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्यावर राहणार भर

 वृत्तसंस्था/ मुंबई

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आपली डिजिटल स्वरुपातील शाखा उघडणार आहे. एसबीआय डिजि बँक या नावाने या शाखा ओळखण्यात येईल. या शाखांमध्ये खातेधारकांना बँकेच्या सर्व सेवा डिजिटल स्वरुपात मिळणार आहेत. बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगण्यात येते.

सध्या विदेशात अशा प्रकारच्या डिजिटल बँक शाखा मोठय़ा प्रमाणात आहे. युरोपात एम-बँक आणि कॅनडामध्ये टॅन्गरिन बँक या डिजिटल सेवा पुरवितात. पुढील तीन  ते सहा महिन्यात या डिजिटल शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या डिजिटल शाखेतून सर्व व्यवहार ऍप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने करण्यात येतील. ही अत्याधुनिक सेवा सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना देण्यात येणार आहे, असे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

या डिजिटल शाखांमध्ये ग्राहकांना खाते उघडण्यासाठी ई-केवायसीचा वापर करण्यात येणार आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे व्यवहार कागदांवर करण्यात येणार नाही. या शाखांत पूर्णतः पेपरलेस व्यवहार होणे अशक्य असले तरी ‘इनटच’ या शाखांच्या सहाय्याने ग्राहकांना खाते उघडण्यास मदत करण्यात येणार आहे. सध्या एसबीआय इनटच या शाखा उघडण्यात आल्या आहेत. एसबीआयच्या डिजि बँकेमध्ये चालू आणि बचत खाते उघडणे, कर्ज देणे, विमा उतरविणे, म्युच्युअल फंड काढणे आणि ठेव रक्कम भरणे यासारख्या सर्व सेवा देण्यात येणार आहेत.