|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नवसामुळे माहुली झाली स्वच्छ

नवसामुळे माहुली झाली स्वच्छ 

प्रतिनिधी/ सातारा

राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी माधवी कदम याच नगराध्यक्ष व्हावा म्हणुन देवीला नवस मागितला. व देवी खरोखर सातारा विकास आघाडीला पावली अन माधवी कदम नगराध्यक्षा झाल्या. आता बोललेला नवस फेडण्यासाठी राजमाता कल्पनाराजे भोसले व नुतन नगराध्यक्षा माधवी कदम या संगम माहूली येथे नदीपात्रावर गेल्या असता तेथील प्रचंड घाणीचे साम्राज्य, गढूळ झालेले नदीपात्र पाहून राजमाता अस्वस्थ झाल्या तेथील स्थानिक ग्रामस्थांची तातडीची बैठक घेवून साफसफाईची सुरुवात केली. ग्रामपंचायतीचीही मदत घेतली व आता दोन व्यक्ती तेथे स्वच्छतेसाठी कायमच्या नेमण्यात आल्या आहेत. त्यामुळे माहूली स्वच्छ होवून तिचे रुपच पालटले आहे.

माहुली येथे जाण्याचा योग जास्त करुन मृत्यूनंतरचा विधी करण्यासाठीचे येतो त्यामुळे सातारकर तेथे जातात व विधी संपन्न करुन माघारी फिरतात. सुमारे 15 वर्षापुर्वी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने तेथे बांधकाम करुन सुदंर स्मशानभुमी उभारली. तेथील परिसर चांगला आहे. मात्र तेथून पुढे माहुलीतील नदीपात्र व तेथील परिसर अत्यंत घाणेरडया अवस्थेत आहे. नदीपात्रातही घाणीमुळे प्रचंड गाळ साचला होता. दुर्गंधी ही येण्यास सुरुवात झाली होती. तसेच येणारी जाणारी माणस पाण्यात व आसपासच्या परिसरात कचरा करुन जात असल्याने परिसरात प्रचंड कचरा साचला होता. त्यामुळे राजमाता कल्पनाराजेंनी कामास तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश दिला.

तब्बल पंधरा दिवस पुर्ण दिवस उन्हातान्हात काम करुन माहुलीतील ग्रामस्थांनी राजमाता कल्पानाराजे यांचा मार्गदर्शनाखाली तो परिसर स्वच्छ केला. 15 दिवस दोन ते तीन जेसीबी लावून नदीपात्रातून 10 ट्रक दगड काढण्यात आली. मंदिर परिसरातील कचरा जमा करुन जाळून टाकला, व येणाऱया जाणाऱया लोकांना वारंवार नदी पात्रात कचरा न टाकण्यासाठी आवाहन केले जात आहे. आणि जरी कोणी कचरा केला अथवा नदीपात्रात काही टाकले तर त्यांच्यावर दंडात्मक 1000 रुपयाची कारवाई करण्यात येणार असल्याचे फलक जागोजागी लावले आहे.  असा एकूण 70 ते 80 हजार रुपये खर्च करुन नदीपात्राबरोबरच परिसरही अत्यंत स्वच्छ केला आहे. राजमाता कल्पनाराजे यांच्याच कृपेने संगम माहुली परिसर अत्यंत स्वच्छ व सुंदर झाले असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.