|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नववर्षारंभी रत्नागिरीत चोरटय़ांचा हैदोस!

नववर्षारंभी रत्नागिरीत चोरटय़ांचा हैदोस! 

भर बाजारातील तब्बल 10 दुकाने फोडली

प्रतिनिधी/ रत्नागिरी

नववर्षाच्या सुरूवातीलाच तब्बल 9 दुकाने फोडत रत्नागिरीत चोरटे सक्रिय झाले आहेत. यामध्ये बहुतांश दुकाने शहरातील मुख्य बाजारपेठेत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या चोऱयांमध्ये 1 लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास झाला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, मात्र वाहनाचा नंबर, चोरटय़ाचा चेहरा यापैकी काहीही स्पष्ट दिसत नसल्याने या चोरटय़ांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, शुक्रवारी मध्यरात्री 2.30 ते 3.15 या वेळेत चोरटय़ांनी हा डल्ला मारला आहे.

शहरातील गोखले नाका परिसरातील संजय एजन्सी, हॉटेल मिनार, वैशाली बार, रत्नागिरी वाईन मार्ट, भिडे उपहार गृह, फॅशन मेन्स, कौशल्या स्वीटस् तसेच भाटय़े येथील रिलॅक्स बीअर शॉप अशी 9 दुकाने फोडत शुक्रवारी मध्यरात्री चोरटय़ाने धुडगूस घातला. यात 1 लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केला. यामध्ये भिडे उपहारगृहात सुमारे 40 हजारांची रोख रक्कम चोरटय़ाने लंपास केली. यासह अन्य दुकानातूनही रोख रकमेसह दुकानातील ऐवज चोरीस गेला आहे. याविषयी व्यावसायिकांचा जबाब नोंदवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, काही ठिकाणी काहीच नाही मिळाले म्हटल्यावर चोरटय़ांनी टीन बिअर फस्त केल्याचेही व्यावसायिकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पहाटे 4.30 च्या सुमारास चोरी झाल्याची खबर पोलिसांपर्यंत पोहोचली. यावेळेपासून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये, विक्रमसिंग पाटील, पोलीस नाईक भितळे आदी अनेक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. सकाळी एक-एक दुकाने उघडत गेली, तशी चोरी झालेल्या दुकानांच्या संख्येत वाढ होत गेली. दिवसभर ठिकठिकाणी याविषयी चर्चा करण्यात येत होती.

येथील दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत 2 चोरटे कैद झाले आहेत. मात्र, त्यावरून चोरटय़ांपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असल्याचे मानले जात आहे. या फुटेजमध्ये 2 व्यक्ती चोरी झालेल्या वेळेत तेथून फिरत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने तसेच एका संशयिताने मास्क वापरलेला असल्याने पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

एकाच निरीक्षकावर दोन ठाण्यांचा भार

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी प्रकृतीच्या कारणाने दीर्घ रजेवर आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याकडे शहर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एकाच पोलीस निरीक्षकावर अतिरिक्त भार असल्याने चोरटय़ाने ही संधी नियोजनपूर्वक साधली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पेट्रोलिंगमधील सतर्कता वाढवणार

या घटनेनंतर पो. नि. अनिल विभुते यांनी पेट्रोलिंग व्यवस्थित होत आहे का, याची तपासणी सुरू केली आहे. कर्मचाऱयांच्या पेट्रोलिंगच्या वेळा कोणत्या, त्या पाळल्या जातात का, याचीही माहिती घेण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. एकूणच पेट्रोलिंगमधील सतर्कता वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

व्यापाऱयांमध्ये नाराजी

चोरटय़ांनी पुन्हा डोके वर काढल्याने व्यापाऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या भागात एकाच रात्री इतकी दुकाने फोडली जात असल्याने व्यापारीवर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान सतर्कता वाढवण्याची गरज असल्याची भावना व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नववर्षात पोलीस अधीक्षकांसमोर आव्हान

नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी 2015 वर्षात घडलेल्या गुन्हेगारीचा आढावा घेतला होता. चोऱयांच्या संख्येत होणारी वाढ मान्य करतानाच या चोऱयांची उकल करण्यातही पोलिसांना चांगले यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या प्रारंभीच चोरटय़ांनी त्यांच्यासमोर हे आव्हान उभे केले आहे. याची व्याप्ती जिल्हाभर पसरू नये, म्हणून ते येत्या काळात काय विशेष उपाययोजना करतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Related posts: