|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रामेश्वर व छत्रपतींच्या भेटीचा सोहळा 17 फेब्रुवारीपासून

रामेश्वर व छत्रपतींच्या भेटीचा सोहळा 17 फेब्रुवारीपासून 

मालवणऐतिहासिक परंपरेची जपणूक करीत तसेच शिवकालीन स्मृतींना उजाळा देणारी अशी कांदळगाव येथील ग्रामदेवता श्री देव रामेश्वर आणि किल्ले सिंधुदुर्ग येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट म्हणून साजरा करण्यात येणारा ऐतिहासिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळा यावर्षी 17 व 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ाचे नियोजन करण्याची बैठक रविवारी कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरात झाली. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी, किल्ला रहिवासी व पदाधिकारी तसेच मालवणातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या सोहळय़ाची माहिती देवस्थान ट्रस्टमार्फत अधिकृतपणे देण्यात आली.

  मालवण येथील भक्तांच्या ऐतिहासिक जिव्हाळय़ाच्या व शिवकालीन सोहळय़ाचे नियोजन करण्यासाठी महत्वाची बैठक कांदळगाव येथील देव रामेश्वर मंदिरात आज  झाली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे ज्येष्ठ मानकरी शिवराम परब (शिवा गावकर), देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम परब, उपाध्यक्ष सत्यवान राणे, सेक्रेटरी उदय राणे, सर्व विश्वस्त-ग्रामस्थ तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याचे मानकरी श्रीराम सकपाळ, मंगेश सावंत, सुभाष कांदळगावकर, बाळकुमार जोशी, प्रकाश कुशे, नगरसेवक गणेश कुशे, सदा चुरी, किशोर जोशी, पपन मेथर, बाबू घाडी, दिलीप वायंगणकर, कांदळगाव सरपंच बाबू राणे, प्रसाद आरोंदेकर आदी सर्व मानकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 यावेळी कांदळगावचे ग्रामस्थ उमेश कोदे यांनी सूचना मांडताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज यांना या ऐतिहासिक सोहळय़ास निमंत्रित करण्यात येऊन त्यांना शिवाजी महाराज व देव रामेश्वर यांच्या भेटीचा इतिहास कथन करावा जेणेकरून या ऐतिहासिक सोहळय़ास महत्व प्राप्त होईल व संपूर्ण महाराष्ट्रात या ऐतिहासिक सोहळय़ाची महती पोहचू शकले, असे सांगितले. सोहळय़ाच्या नियोजनाची बैठक पुन्हा घेण्याचे ठरविण्यात आले. सर्वांना विश्वासात घेऊन या सोहळय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष शिवराम परब यांनी सांगितले.