|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ख्रिस्ती बांधवांसाठी कनाननगरातील ‘चर्च’ ठरतेय प्रेरणादायी

ख्रिस्ती बांधवांसाठी कनाननगरातील ‘चर्च’ ठरतेय प्रेरणादायी 

संग्राम काटकर/ कोल्हापूर

  न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चचा मागील भाग म्हणजे कनाननगर झोपडपट्टी.  इथल्या बहुतेकांचे राहणीमान तसे साधेच. पण गेल्या काही वर्षांच्या या झोपडपट्टीवासियांचे राहणीमान सुधारले आहे. त्यांनी केलेल्या कष्टाचे हे फलीत आहे. तरूण वर्गही चांगल्या शिक्षणापासून ते नोकऱयांपर्यत पोहोचू लागला आहेत. अशी एकंदरीत सध्याच्या कनाननगराची ओळख. आता या ओळखीत एका चर्चची भर पडली आहे. सुरज कांबळे या तरूणाने चर्च (प्रार्थना मंडळी) स्थापन केले आहे. ख्रिस्ती समाजातील नव्या दमाच्या तरूणाईसह सर्वांनीच वाममार्गाला न जाता प्रभू येशूच्या वचनांवर आधारीत जीवनमार्ग शोधण्यास उद्युक्त करणे एवढीच चर्चच्या स्थापनेमागेची भावना आहे. या चर्चमुळे काही तरुणांच्या जीवनात तर आमुलाग्र बदल घडला आहे.

  कांबळे हे मुळचे शहापुरचे (इचलकरंजी). आठ-दहा वर्षापूर्वी ते इचलकरंजीतील पॉवरलूम मशिनरीवर कामगार म्हणून काम करत बायबल मधील वचनांचा ख्रिस्ती समाजात प्रसार करत होते. चांगल्या जीवनाबद्दल सल्ला मसलत करत होते. या कार्यामुळे कांबळे यांची समाजात जशी ओळख वाढू लागली तसे कामातून वेळ काढून ख्रिस्ती बांधवांपर्यंत बायबलमधील वचने पोहोचविणे त्यांना शक्य होईनासे झाले. त्यामुळे पॉवरलूमचे काम सोडून त्यांनी बालिंगा येथे राहण्यास येणे पसंत केले. येथे आल्यानंतर कनाननगर झोपडपट्टीत ख्रिस्ती बांधवांसाठी चर्च स्थापन करुन त्यांच्यापर्यंत वचने पोहोचविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानूसार 2010 ला ग्लोरीयस प्रोफेटीक मिनिस्ट्रीज् या नावाने चर्चची म्हणजेच प्रार्थना मंडळीची स्थापना केली. आपल्या आई-वडीलांच्या इच्छेनूसार उद्योजक रविंद्र मोरे यांनी चर्चसाठी आपली जागा दिली. या जागेवर कांबळे यांनी पतऱयाचे चर्च उभारले. दिवस जसे सरकू लागले तसे त्यांनी चर्चमध्ये नागरिकांना कर्जांमध्ये अडकू नये, गुटखा, सिगारेट, दारू, मावा, मारामारी, आमिष यापासून दुर रहा असे उपदेश देण्यास सुरवात केली. याशिवाय चर्चमध्ये प्रत्येक शुक्रवारी उपवास प्रार्थना तर प्रत्येक रविवारी परमेश्वराची प्रार्थना असे होईल, असे जाहिर केले. पहिले काही महिने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच तरुण व नागरिक चर्चमध्ये येऊन प्रार्थना करु लागले. जशी चर्चची माहिती समाजात पसरु लागली तशी मात्र कनानगर परिसरच नव्हे इतर भागातील ख्रिस्ती बांधवही चर्चकडे प्रार्थनेसाठी येऊ लागले. प्रत्येक शुक्रवारच्या उपवास प्रार्थनेबरोबर रविवारी केल्या जाणाऱया परमेश्वराच्या प्राथनेसाठी तर तरुणांचा ओघ वाढू लागला. प्रार्थनेनंतर पास्टर कांबळे हे स्वतः सर्वांना उपदेश देऊन त्यांना वाम मार्ग सोडण्यास उद्युक्त करू लागले. त्यांच्या या उपदेशामुळे काही तरुणांमध्ये कमालीचा बदल घडून आला. या तरुणांनी व्यवसनापासून ते अगदी गुंडगिरीचा मार्ग सोडून चांगली जीवनशैली जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे. बायबल मध्ये मत्तय-1128-अहो कष्टी व भाराक्रांत जनहो असे वचन नमुद आहे. तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन असा या वचनाचा अर्थ आहे. कांबळे यांनी चर्चची स्थापना करुन प्रभू येशु यांच्या या वचनाला सत्यात आणले आहे. त्यांनी तरुणांना व्यसनापासून दुर करण्याच्या केलेल्या कृतीला तर खरोखरच आदर्शवतच म्हणावे लागेल.

  मागिल महिन्यात झालेल्या ख्रिसमस दिवशी तर शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये अनेकांनी उपासना केल्यानंतर कनानगरातील कांबळे यांच्या चर्चला भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच तुमच्या चांगल्या कार्यात आम्ही हक्काने सहभागी होऊ अशी प्रोत्साहनपर कांबळे ही प्रतिक्रीया देत आपणाला लागेल ती मदत करू असे अभिवचनही दिले. मात्र कांबळे यांनी मदत नको फक्त चर्चमध्ये येऊन स्वतःसाठी, समाजासाठी आणि विश्वासाठी प्रार्थना करा, एवढीच अपेक्षा आहे, असे सांगून सर्वांची मने जिंकली