|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेततळय़ात बुडून मुलीचा मृत्यू

शेततळय़ात बुडून मुलीचा मृत्यू 

वार्ताहर/ बुगटे आलूर

शेळी चारण्यासाठी भाऊ व मैत्रिणीसह गेलेल्या मुलीचा शेततळय़ामध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. सदर घटना नांगनूर के. एस. ओढय़ानजीकच्या शेततळय़ात रविवारी सायंकाळी 4 वाजता घडली.

नांगनूर के. एस. येथील पाचवीमधील विद्यार्थिनी मधुरा मारुती कुलकर्णी (वय 12) ही आपल्या लहान भावासह व मैत्रिणीसह शेळी चारण्यासाठी गावानजीकच्या ओढय़ाकडेला गेली होती. त्या ठिकाणी असलेल्या तानाजी देवाप्पा कांबळे यांच्या शेततळय़ाजवळ खेळत असताना अचानक मधुराचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. शेततळय़ामध्ये अंदाजे 8 ते 10 फूट खोल पाणी असल्याने मधुराला वरती येता आले नाही. याचवेळी तिचा लहान भाऊ सुशांत याने हे पाहून आरडाओरड करीत नजीकच्या शेतामधील आईकडे गेला तर मैत्रिणीने गावाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना घटनेची कल्पना दिली तर ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पण मधुरा पूर्णपणे पाण्यात बुडाली होती.

ग्रामस्थांनी तिला बाहेर काढण्यासाठी त्या शेततळय़ाला पंप बसवून पाणी तळय़ाबाहेर काढले तर काहींनी तळय़ात उतरून शोध घेतला. अखेर पाणी कमी झाल्यानंतर मृतदेह सापडला.

लहान भाऊ बचावला

सुशांत हा घटना घडली त्यावेळी बहिणीला वाचवण्यासाठी धडपड करीत होता तर या तळय़ामध्ये प्लास्टीक कागद असल्याने तो मधुराला काढण्यासाठी पाण्याकडेला गेला होता. जर आत गेला असता तर मधुराने घाबरून सुशांतलाही ओढले असते तर फार मोठा अनर्थ घडला असता.

घटनास्थळी हळहळ

मधुरा व सुशांत ही दोनच मुले मारुती कुलकर्णी यांना असल्याने त्यांच्यासाठीच दैनंदिन मोलमजुरी करीत त्यांना मोठे केले आहे. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने त्यांच्यावर असा प्रसंग ओढवल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती. तर शिक्षक, मुख्याध्यापक व सीआरपी यांनी घटनास्थळी भेट देऊन हळहळ व्यक्त केली.

या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकामध्ये करण्यात आली आहे.

Related posts: