|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » व्हिएतनामला ‘आकाश’ क्षेपणास्त्र देणार भारत

व्हिएतनामला ‘आकाश’ क्षेपणास्त्र देणार भारत 

चीनला घेरण्यासाठी नवा पुढाकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

व्हिएतनामला जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश क्षेपणास्त्र देण्यावर भारत गांभीर्याने विचार करत आहे. दोन्ही देशांदरम्यान होणाऱया या व्यवहाराआधी चीनला यावरून चिंता सतावू लागली आहे. चीन भारताला अनेक मुद्यांवर सातत्याने अडथळा आणत असतो. एनएसजी सदस्यत्व असो किंवा दहशतवादी हाफिज सईद याचा मुद्दा असो चीनने नेहमीच भारताच्या योजनेत खोडा घातला आहे.

भारताच्या नवा प्रयत्नाकडे आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. याशिवाय चीनने हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाच्या कारवाया देखील वाढविल्या आहेत. याच्या प्रतिक्रियेदाखल भारताने चीनच्या शेजारी देशांसोबत वेगाने संबंध बनविण्याचे धोरण अवलंबिले आहे. जपान आणि व्हिएतनामसोबत भारताची ‘रणनीतिक आणि लष्करी’ भागीदारी याचेच प्रतिबिंब आहे.

धोरणात बदल

चीनच्या खेळीला मात देण्यासाठी भारताने आपल्या धोरणात बदल आणत जपान आणि व्हिएतनामशी सामरिक करारांचे पाऊल टाकले आहे. यानुसार भारत आणि व्हिएतनामदरम्यान आकाश क्षेपणास्त्रावरून चर्चा सुरू आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता जवळपास 25 किलोमीटर आहे, याशिवाय भारताने हेलिकॉप्टर, ड्रोन समवेत ब्राह्मोस क्षेपणास्त्र देखील देऊ केले आहे.

सुखोईचे प्रशिक्षण

याशिवाय भारत यावर्षापासून व्हिएतनामच्या वैमानिकांना सुखोई विमानाच्या उड्डाणाचे प्रशिक्षण देईल. दोन्ही देशांच्या सहकार्याने हवाई सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यावर देखील विचार सुरू आहे. भारताने 2007 साली व्हिएतनामसबेत रणनीतिक भागीदारीस प्रारंभ केला होता.

तंत्रज्ञान हस्तांतरण

व्हिएतनामने तंत्रज्ञान हस्तांतरणाबरोबरच हवाई सुरक्षा यंत्रणेच्या संयुक्त निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. भारताने देखील याची पुष्टी दिली आहे. आकाश क्षेपणास्त्रावर संयुक्त कार्यक्रम करणे सोपे आहे. परंतु संयुक्त कार्यक्रमात ब्राह्मोसची विक्री किंवा तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावरून समस्या येऊ शकते. ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारत-रशियाच्या संयुक्त कार्यक्रमाद्वारे विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे 60 टक्के सुटे भाग रशियाचे आहेत.

सामरिक क्षमतेत वाढ

व्हिएतनाम रशियाकडून सुखोई लढाऊ विमाने आणि पाणबुडय़ा मिळवून सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. 2013 साली भारताने आपल्या नौदल तळात व्हिएतनामच्या नौसैनिकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.