|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिरवल पाठोपाठ कणकवली ‘लक्ष्य’

शिरवल पाठोपाठ कणकवली ‘लक्ष्य’ 

कणकवलीशिरवल येथे चोरटय़ांनी धुडगूस घालून 24 तास उलटत नाहीत, तोच कणकवलीतील कनकनगर येथील श्रीधर अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट अज्ञात चोरटय़ांनी फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने यात चोरटय़ांच्या हाती काही लागले नसले, तरी तालुक्यात सुरू असलेल्या चोऱयांच्या सत्रामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. ही घटना 31 डिसेंबर ते मंगळवारी सकाळपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरीप्रकरणी आणलेले श्वानपथकही अपार्टमेंटच्या मागील नदीकडील बाजूला असलेल्या अपार्टमेंटनजीक घुटमळले. दरम्यान, तेलीआळी येथे देखील एक फ्लॅट फोडण्यात आला. मात्र त्यांनी चोरीस काही न गेल्याने तक्रार देण्यात आली नाही.

कनकनगर येथील श्रीधर अपार्टमेंटमध्ये निकिता नीळकंठ बगळे व सुभाष बांदेकर यांचे तळमजल्यावर फ्लॅट आहेत. यातील सौ. बगळे यांचा फ्लॅट राजेंद्र बाळकृष्ण सावंत यांना भाडय़ाने दिला आहे. मुंबईस्थित सावंत हे या फ्लॅटवर येऊन-जाऊन असतात. फ्लॅटमध्ये सावंत यांची आई राहते. त्या 31 डिसेंबर रोजी मुंबईला गेल्या होत्या. मुंबई पोलिसात असलेले सुभाष बांदेकर हे देखील आपल्या फ्लॅटवर अधूनमधून येत असतात. त्यांचाही फ्लॅट बंदच असतो. त्यांचे मूळ घर कुंभवडे येथे असल्याने या फ्लॅटमध्येही त्यांचे विशेष साहित्य नव्हते. बगळे यांच्या फ्लॅटमधील भाडेकरू सावंत यांच्या असलेल्या कपडय़ांच्या बॅगा व अन्य साहित्य चोरटय़ांनी चाचपडून पाहिल्याचे दिसून आले.

                            कडी तुटलेली दिसली

मंगळवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास या अपार्टमेंटमधील मेघा रमण बाणे यांना त्यांच्या फ्लॅटसमोर असलेल्या बांदेकर यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. बांदेकर आले असल्याच्या शक्यतेने सकाळी चौकशी करायला गेल्या असता त्यांना फ्लॅटचा कडी कोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. याचवेळी बगळे यांच्या फ्लॅटचा दरवाजाही उघडा दिसला. याबाबत त्यांनी संबंधितांना फोनवरून माहिती दिली. दरम्यान मेघा बाणे यांना मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मोठय़ाने आवाज आला. मात्र पहाटेची वेळ असल्याने घराबाहेर येणे टाळले. बहुदा त्याच वेळी चोरटय़ांनी दरवाजाची कडी कोयंडा तोडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

                         फिर्याद दाखल

याबाबत फ्लॅटच्या मालक निकिता बगळे यांनी मंगळवारी सकाळी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना त्यांचे भाडेकरू सावंत यांनी घटनेची माहिती फोनवरून मंगळवारी सकाळी दिली. त्यानंतर सौ. बगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या स्थितीत दिसला.  फ्लॅटच्या आतील साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत होते. ही घटना 31 डिसेंबर 2015 ते 10 जानेवारी 2016 च्या दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच सौ. बगळे यांनी बांदेकर यांना घडल्या घटनेबाबत फोनवरून कल्पना दिली. मात्र त्यांच्या फ्लॅटमधील साहित्य विस्कटलेल्या स्थितीत नव्हते. बांदेकर यांनीही आपल्या फ्लॅटमध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू व पैसे नव्हते, असे बगळे यांना सांगितले. त्यामुळे श्रीधर अपार्टमेंटमधील दोनही फ्लॅट फोडून चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सौ. बगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                       श्वानपथक घुटमळले

दरम्यान, दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी श्वानपथकाद्वारे तपास करण्यात आला. यामध्ये एन. डी. झेमणे, अमित वेंगुर्लेकर यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषणचे कर्मचारी होते. यावेळी ‘पवन’ श्वानाने अपार्टमेंटच्या पुढे नदीकडे जाणाऱया रस्त्याकडे धाव घेतली. तेथून स्वामी अपार्टमेंटनजीक पवन घुटमळला. त्यामुळे कदाचित तेथे चोरटय़ांनी गाडी पार्किंग करून ठेवल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान शिरवल येथे सोमवारी रात्रीनंतर सहा ठिकाणी चोरी झाल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची गरज होती. या पूर्वीही चोरटय़ांनी कणकवलीत अनेकदा धुमाकूळ घातला होता. कणकवली शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र हे सीसीटीव्ही गुह्यांच्या तपासाच्यादृष्टीने आतापर्यंत फारसे उपयोगात आलेले दिसून आले नाहीत. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस तपास होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

             साखरेचा डबा उघडून ठेवला

  सावंत राहत असलेल्या फ्लॅटच्या किचनमधील साखरेचा डबा चोरटय़ांनी उघडून ठेवला होता. त्यातील साखर चोरटय़ांनी चमच्याने खाल्याचेही दिसून येत होते. त्यामुळे चोरटे चोरी करताना बिनधास्तपणे वावरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या फ्लॅटमधील पंखा देखील सुरू करून ठेवण्यात आला होता.