|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बिबटय़ाने हल्ला केल्याचा ‘तो’ बनावचबिबटय़ाने हल्ला केल्याचा ‘तो’ बनावच 

कुडाळवेंगुर्ले तालुक्यातील कोचरा-भावईवाडी येथे डुकराच्या शिकारीसाठी फासकी लावण्यात आली होती. शिकार साध्य झाल्याचे समजून तेथे गेलेला चंद्रकांत आत्माराम झाड (55) याच्यावर फासकीत अडकलेल्या बिबटय़ाने हल्ला करून त्याला जखमी केल्याचे वन विभागाच्या तपासात उघड झाले. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये झाड याच्यासह तेथीलच तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 जानेवारी रोजी घडली होती. यामुळे झाड व त्याच्या साथीदारांचा बिबटय़ाने हल्ला केल्याचा बनाव उघडकीस आला.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित झाड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील बाळकृष्ण प्रभाकर कोचरेकर (31, कोचरा-भटवाडी) व अरुण वामन परब (47, रा. कोचरा) या संशयितांना वन विभागाने सोमवारी ताब्यात घेत अटक केली. मंगळवारी या दोघांनाही वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता 12 जानेवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली.

4 जानेवारी रोजी सकाळी कोचरा-भावईवाडी येथील चंद्रकांत झाड घरातून माळरानावर जात होता. तेव्हा वाटेत बिबटय़ाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले हेते. त्याच्या डोक्यावर व उजव्या हातावर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

        बिबटय़ा फासकीत अडकल्याची मिळाली माहिती

या घटनेनंतर मठ वनपाल मडवळ यांनी झाड याची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तसेच वन विभागाने त्याला दहा हजार रु. तात्काळ मदतही  दिली होती. मात्र, कुडाळचे वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर यांना मोबाईलवरून गोपनीय माहिती मिळाली. झाड हा शेताकडे जाताना बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झाला नाही, तर त्याने डुकराच्या शिकारीसाठी फासकी लावली होती. पण त्यात बिबटय़ा अडकल्याने त्याला सोडविताना त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि तो जखमी झाला, अशी चर्चा आहे, अशी माहिती प्राप्त झाली.

गोपनीय माहितीनुसार कोकितकर यांनी तपास सुरू केला. 8 जानेवारी रोजी ते कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचासमक्ष तेथील तुळशीदास घाडी याने घटनेचे ठिकाण दाखविले. तेव्हा ती जागा अरुण परब याच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. घाडी यांच्याकडे चौकशी केली असता, तेथे बिबटय़ा फासात अडकला होता व त्याला सोडविताना झाड याच्यावर त्याने हल्ला करून जखमी केले, असे त्यांनी सांगितले.

                फासकी लावल्याचे पुरावे सापडले

घटनास्थळी धामणीची बेचकी सापडली. त्याला बिबटय़ाचे केस लागले होते. तसेच धामणीच्या फुटक्यांनाही बिबटय़ाचे केस आढळले. फासकीसाठी काजूच्या झाडाला लावलेला वासा अरुण परब याने दिला आणि या वाशाला लावलेल्या फासात बिबटय़ा अडकलेला होता, असे त्यांनी चौकशीत सांगितले, अशी माहिती कोकितकर यांनी दिली. वाशाला तार बांधलेल्या खुणा व बिबटय़ाचे केस मिळाले. बेचकी, केस व वासा जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

                   झाड यानेही दिली कबुली

कोकितकर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन झाड याची चौकशी केली. त्या चौकशीत आपण बाळकृष्ण कोचरेकर व अरुण परब यांनी मिळून डुकराच्या शिकारीसाठी फासकी लावली होती, अशी गुन्हय़ाची कबुली दिली. त्यामुळे झाड याला फासकीत अडकलेल्या बिबटय़ाने जखमी केले. त्याच्यावर जाताना वाटेत हल्ला केला नाही, हे उघड झाले. फासकीत अडकलेल्या बिबटय़ाला सोडविण्यासाठी झाड गेला होता. तेव्हा तेथे बिबटय़ाला सोडविण्यासाठी किरण किनळेकर, दशरथ कोरगावकर व नारायण चांदेरकर गेले होते. त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला.

उपवनसंरक्षक रमेशकुमार व सहाय्यक वनसंरक्षक पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकितकर तपास करीत आहेत. त्यांना झाड व त्याच्या साथीदारांचा बनाव उघड करण्यात यश आले आहे. याकामी वनपाल रामचंद्र मडवळ, वाडोस वनरक्षक सावळा कांबळे, मठ वनरक्षक विष्णू नरळे, वनरक्षक सुरेश मेतर (फिरते पथक, सावंतवाडी) यांनी सहकार्य केले.

                        तिघांवर गुन्हा दाखल ः दोघांना वनकोठडी

चौकशीअंती झाड याच्यासह बाळकृष्ण कोचरेकर व अरुण परब या तिघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39 (डी), 50, 51 चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमधील बाळकृष्ण व अरूण यांची चौकशी सहाय्यक वनसंरक्षक एस. जी. पुराणिक यांनी जबाब घेतला. नंतर त्या दोघांनाही अटक करून मंगळवारी वेंगुर्ले न्यायालयात हजर करण्यात आले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!