|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लोकसंख्या, लोकशाही, मागणी ही भारताची शक्तीस्थाने

लोकसंख्या, लोकशाही, मागणी ही भारताची शक्तीस्थाने 

व्हायब्रंट गुजरात सोहळय़ात पंतप्रधान मोदींचे उद्गार

गांधीनगर / वृत्तसंस्था

भारताचे सामर्थ्य त्याची लोकसंख्या, लोकशाही आणि मागणी यात आहे. त्यामुळे भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. लोकशाहीमध्ये वेगाने आणि ठाम निर्णय होत नाहीत, असा आरोप होतो. पण गेल्या अडीच वर्षांच्या काळात हा समज आम्ही खोटा ठरविला आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित भव्य ‘व्हायब्रंट गुजरात’ सोहळय़ात बोलताना काढले.

मेक इंन इंडिया हे घोषवाक्य आता साऱया जगात लोकप्रिय झाले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम या मोहिमेने केले आहे. आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासात इतका लोकप्रिय औद्योगिक ब्रँड विकसीत झालेला नाही. भारत आता औद्योगिक उत्पादनात जगातील सहाव्या क्रमांकाचा देश बनला आहे, अशी भलावण त्यांनी केली.

भ्रष्टाचाराविरोधात लढाई

नोटाबंदीचा निर्णय घोषित करून आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या सरकारने भ्रष्टाचार आणि काळय़ा पैशाविरोधात युद्ध छेडले आहे. त्याचप्रमाणे नातेवाईकशाही आणि लालफितशाहीवरही प्रभावी नियंत्रण आणण्यात आले आहे. देशाचा आर्थिक कारभार स्वच्छपणे चालावा यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

सरकारवर स्तुतीसुमने

या सोहळय़ात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचीही भाषणे झाली. मोदी आणि केंद्र सरकारच्या दूरदृष्टीच्या धोरणामुळे देशाची प्रगती होत आहे. आपल्या उद्योगसमूहाने मोदींच्या धोरणांमुळे गुजरातमध्ये आतापर्यंत सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे प्रतिपादन मुकेश अंबांनी यांनी केले. तर गुजरातमध्ये आपण 49 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला.