|Friday, July 28, 2017
You are here: Home » क्रिडा » फुटबॉलपटू रोनाल्डो ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानितफुटबॉलपटू रोनाल्डो ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित 

पुरस्काराच्या शर्यतीत अर्जेन्टिनाच्या लायोनेल मेस्सीवर मात, चौथ्यांदा कोरले पुरस्कारावर नाव

वृत्तसंस्था/ झ्युरिच

युरो चषक जेत्या पोर्तुगाल संघाचा कर्णधार व रियल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू मेस्सीला मात देत फिफाकडून दिल्या जाणाऱया ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कारावर चौथ्यांदा नाव कोरले आहे. झुरिच येथे झालेल्या फिफाच्या वार्षिक पुरस्कार सोहळय़ात अध्यक्ष जिआनी इन्स्फॅस्टीनो यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला.

2016 मधील उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडूच्या शर्यतीत रोनाल्डोला फ्रान्सच्या ग्रिजमन व अर्जेन्टिनाच्या मेस्सी या प्रमुख खेळाडूंचे आव्हान होते. या दोन्ही खेळाडूंना मात देत त्याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. याआधी 2008, 2013 व 2014 अशी तीनवेळा रोनाल्डोने या पुरस्काराला गवसणी घातली होती. रोनाल्डोने 2016 मध्ये पोर्तुगाल व माद्रिद संघाकडून खेळताना 59 गोल केले तर 16 गोलमध्ये सहायकाची भूमिका बजावली. वर्षभरात सातत्याने खेळ करताना आपल्या नेतृत्वाखालील दोन्ही संघाना चार जेतेपद मिळवून दिली आहेत. रोनाल्डोची चुरस ग्रिजमन व मेस्सी या दोघांशी होती. रोनाल्डोने 34.54 टक्के मते मिळवताना या दोघांना पिछाडीवर टाकत हा पुरस्कार पटकावला. मेस्सीच्या पारडय़ात 26.42 तर ग्रिजमनला 7. 53 टक्के मते मिळाली.

दरम्यान, ‘गतवर्ष माझ्यासाठी स्वप्नवत होते आणि या सन्मानाने मी भारावून गेलो आहे,’ अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने यावेळी व्यक्त केली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला प्रतिष्ठेच्या बॅलड डीओर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच यावेळी उत्कृष्ठ रेफ्री म्हणून इटलीच्या क्लाऊडीओ रेनोडी यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी फ्रान्सच्या झिनेदीन झिदान यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!