|Monday, July 31, 2017
You are here: Home » क्रिडा » मुंबईचा 228 धावांत धुव्वामुंबईचा 228 धावांत धुव्वा 

गुजरातचा भेदक मारा, पृथ्वी शॉचे चमकदार अर्धशतक, यादव 57, आरपी, चिंतन, रुजुलचे 2 बळी

वृत्तसंस्था/ इंदोर

17 वर्षीय पृथ्वी शॉचा चमकदार खेळ, सूर्यकुमार यादवने संयमी अर्धशतकी खेळी केली तरी गुजरातच्या गोलंदाजांनी शेवटच्या दोन सत्रांत अप्रतिम मारा केल्यामुळे रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीतील पहिल्या दिवशी गुजरातने मुंबईला 228 धावांत गुंडाळले. दिवसअखेर गुजरातने एका षटकात बिनबाद 2 धावा जमविल्या होत्या.

या लढतीचे पहिले सत्र गाजविले ते युवा पृथ्वी शॉने. त्याने निर्मय व आत्मविश्वासपूर्ण खेळी करीत केवळ 93 चेंडूत 71 धावा फटकावल्या. त्याला सूर्यकुमार यादवकडून चांगली साथ मिळाली. पण इतर फलंदाजांनी चांगली सुरुवात करूनही त्याचे त्यांना मोठय़ा खेळीत रूपांतर करता न आल्याने मुंबईला 228 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातच्या आरपी सिंग, चिंतन गाजा, रुजुल भट्ट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

पृथ्वी शॉचा आक्रमक खेळ

खेळपट्टीवर किंचित हिरवळ असल्याने गुजरातने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी अखिल हेरवाडकरला 4 व सिद्धेश लाडला 23 धावांवर बाद करून तो सार्थही ठरविला. मात्र त्यानंतर शॉ व सूर्यकुमार यादव यांनी 52 धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव थोडाफार सावरला. शॉने प्रारंभापासूनच आक्रमक धोरण स्वीकारले होते. त्याने गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला करीत शानदार अर्धशतक झळकवले. पण दुर्दैवाने 71 धावांवर तो धावचीत झाल्याने सलग दुसऱया सामन्यात शतक झळकवण्याची त्याची संधी हुकली. त्याने 93 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार मारले. यादवने 57 धावांचे योगदान दिले असले तरी भोपळा फोडण्यासाठी त्याने तब्बल 39 चेंडू घेतले. एका खराब फटक्यावर तो बाद झाला. अभिषेक नायरने 35 धावा जमवित मुंबईला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. पण रुजुल भट्टने त्याची खेळी संपुष्टात आणत मुंबईचा डावही 83.5 षटकांत 228 धावांत संपवला.

उपाहाराला मुंबईची स्थिती 2 बाद 97 अशी भक्कम होती. पण गुजरातच्या गोलंदाजांनी नंतरच्या दोन सत्रात भेदक मारा करीत मुंबईचे 8 बळी मिळविले. श्रेयस अय्यर 14, कर्णधार आदित्य तरे 4, बलविंदर सिंग संधू 6, दाभोळकर 3 धावा काढून बाद झाले तर शार्दुल ठाकुर शून्यावर बाद झाला. आरपी सिंगने 48 धावांत, गजाने 46 धावांत तर भट्टने 5 धावांत 2 बळी मिळविले. रुश कलेरिया व हार्दिक पटेल यांनी एकेक बळी मिळविला. रणजी अंतिम सामन्यातील पहिल्या डावात केलेली तिसऱया क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी 1972-73 मध्ये तामिळनाडूविरुद्ध त्यांनी पहिल्या डावात 151 आणि 1947-48 मध्ये होळकर संघाविरुद्ध 191 धावा जमविल्या होत्या. सूर्यकुमार यादवने या सामन्यात प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 4000 धावांचा टप्पाही पार केला.  2010 मध्ये पदार्पण केल्यानंतर मुंबईतर्फे त्यानेच सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. दुसऱया क्रमांकावर असणाऱया अभिषेक नायरने 3264 धावा जमविल्या आहेत.

गुजरातचे सलामीवीर समित गोहेल व प्रियंक पांचाळ यांनी एक षटक कोणताही धोका न पत्करता खेळून काढले. गोहेलने या षटकात 2 धावा घेतल्या. मुंबईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहून प्रशिक्षक चंद्रकांत पंडित संतप्त झाले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या गोलंदाजांसमोर कठीण आव्हान असून गुजरातच्या भक्कम फलंदाजी लाईनअपसमोर त्यांची परीक्षाच होणार आहे. पांचाळ हा या मोसमातील सर्वात यशस्वी फलंदाज असून गोहेल, पार्थिव पटेलही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

संक्षिप्त धावफलक : मुंबई प.डाव 83,5 षटकांत सर्व बाद 228 (पृथ्वी शॉ 93 चेंडूत 71, सूर्यकुमार यादव 57, नायर 35, लाड 23, अय्यर 14, अवांतर 11, आरपी सिंग 2-48, गाजा 2-46, रुजुल भट्ट 2-5, हार्दिक पटेल 1-54, कलारिया 1-66), गुजरात प.डाव 1 षटकात बिनबाद 2 (गोहेल खेळत 2, पांचाळ खेळत आहे 0).

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!