|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » क्षेत्रसभा दिखाऊपणा नको, अंमलबजावणी कराक्षेत्रसभा दिखाऊपणा नको, अंमलबजावणी करा 

कुपवाड / वार्ताहर

महापालिका प्रशासनाने नागरीकांच्या समस्या जाणुन त्या सोडविण्यासाठी महापालिका क्षेत्रात क्षेत्रसभेचे उचललेले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, क्षेत्रसभा निव्वळ दिखावुपणा नको, तक्रारींची गांभिर्याने दखल घेवुन उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करा, अशा मागणीचा सुर मंगळवारी कुपवाडमधील प्रभाग पाचमधील नागरीकांतुन आला. दरम्यान, पहिल्याच घेतलेल्या सभेत नागरीकांनी तळतळीने मांडलेल्या समस्या व तक्रारींचा भडीमार करुन प्रशासनाला घाम फोडला. परंतु, प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे सभेत सुरुवातीपासुन शेवटपर्यंत गोधळात गोंधळ उडाला आणि प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

महापालिका क्षेत्रात प्रशासनाने क्षेत्रसभा घेण्याचा निर्णय घेवुन ‘महापालिका आपल्या दारी…सांगा आपल्या तक्रारी’ हा राज्यातील पहिला उपक्रम हाती घेवुन नागरीकांच्या तक्रारी आणि समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. त्य़ाची सुरुवात मंगळवारी उपमहापौर विजय घाडगे व नगरसेविका सौ.निर्मला जगदाळे यांच्या कुपवाडमधील प्रभाग पाचमधुन झाली. सभेला उपमहापौर विजय घाडगे, नगरसेविका सौ.निर्मला जगदाळे, नगरसेवक शेखर माने, गजानन मगदुम, शिवसेना नेते पृथ्वीराज पवार, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील, सहा.आयुक्त स्नेहलता कुंभार यांसह आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईटसंह सर्व विभागाचे खातेप्रमुख, कर्मचारी विविध पक्षाचे पदाधिकारी, प्रभागातील महिला-पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात वंदे मातरमने झाली. स्वागत सहा.आयुक्त स्नेहलता कुंभार यांनी करुन विषयपत्रिकेवरील विषय नागरीकांसमोर मांडले. प्रारंभी शेखर माने यांनी क्षेत्रसभा घेणे कायद्याने बंधनकारक असल्याचे सांगुन क्षेत्रसभा कशासाठी घ्यायची याविषयी माहिती दिली. यापुढे महापालिका क्षेत्रात दोन महिण्यातुन एकदा किमान 20 क्षेत्रसभा घेण्याची तयारी प्रशासनाने घ्यावी. क्षेत्रसभेमुळे विकासाची सुरुवात कुपवाडमधुन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपायुक्त सुनील पवार यांनी महापालिकेची परिस्थिती आणि विकासकामांविषयी माहिती देत मनपात एकुण 2377 कर्मचारी असुन त्यांचा महिण्याचा पगार 9.50 कोटी खर्ची पडतो. लाईटबील सव्वाकोटी भरले जाते, वर्षाकाठी 50 ते 60 कोटी खर्च होतो. त्य़ानंतर शासनाचा निधी आणि नागरीकांनी भरलेल्या कराच्या उत्पनातुन विकासकामे मार्गी लावली जात असल्याचे सांगितले .

प्रशासनासमोर तक्रारी मांडताना नागरीकांनी पहिल्यांदा आरोग्य, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना टार्गेट केले. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरीक कर भरतो. पण, त्याबदल्यात आवश्यक सुविधा मिळत नाहीत. प्रभागात 80 टक्के गुंठेवारी अविकसीत भाग आहे. सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असुन रस्त्यांची दुरुस्ती करा, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करा. प्रभागात कचरा उठाव होत नाही. गटारी साफ केल्या जात नाहीत. नगरसेवक प्रभागात फिरकत नाहीत. मनपाकडे तक्रारी केल्यास प्रशासन दाद घेत नाही. मग, जाब विचारायचा कोणाला, असा सवाल व्यक्त केला. औषध फवारणी, कचरा उठाव होत नाही. गटारी साफ केल्या जात नाही. डासांचा, मोकाट जनावरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अंतर्गत रस्ते दुरुस्त होत नसल्याने अपघात वाढले आहेत. आवश्यक पिण्याचे पाणी मिळत नाहीत. एकही क्रीडांगण नाही. शौचालय, स्वच्छतागृहे नाहीत. यासंह आरोग्य, पिण्याचे पाणी, स्ट्रीटलाईटच्या समस्या नागरीकांनी मांडल्या. सभेच्या शेवटी उपमहापौर विजय घाडगे व सौ.जगदाळे यांनी साडेतीन वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोगा मांडला. त्यानंतर उर्वरित दिड वर्षात काय करणार? असा सवाल नागरीकांनी व्यक्त केल्याने यापुढे नागरीकांच्या आवश्यक सुविधा देण्यात प्राधान्य देवुन समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही नगरसेवकांनी दिली. प्रभागातील अरविंद सकट, परवेज मुलाणी, सागर पाटील, आनंदराव वाघमोडे, सुनील पर्डीकर, अनिल धायगुडे, संगीता मोरे, रेखा जाधव यांसह अन्य नागरीकांनी समस्या प्रभावीपणे मांडल्या.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!