|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नार्वेतील युवकाचा दगडाने ठेचून खूननार्वेतील युवकाचा दगडाने ठेचून खून 

 

प्रतिनिधी/ डिचोली

गावकरवाडा नार्वे येथील मुख्य जक्शंनजवळ असलेल्या साकवाखाली येथील एका युवकाचा दगडाने ठेचून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. तसेच त्याला तीस मीटर अंतरावर ठार करून साकवाखाली लपवून ठेवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याने सदर प्रकार खुनाचाच असल्याचा कायास पोलिसांचा आहे. डिचोली पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून मयत सतीश गुरुदास परवार (17) या युवकाच्या दोघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणी डिचोलीचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सतीश परवार हा युवक सुरज आसवे व गणेश रावळ या आपल्या मित्रांसमवेत गेल्या शनिवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी रात्री म्हावळींगे येथे कालोत्सवाला गेला होता. कालोत्सवाला जाण्यापूर्वी त्यांनी प्रथम व नंतरही म्हावळींगे येथे मद्यपान केले होते. कालोत्सव संपवून हे तिघेही एकाच दुचाकीवरून नार्वेत आले. दुचाकी गणेश रावळ चालवत होता. त्याने गावकरवाडा येथे सदर जंक्शनजवळ सुरज व सतीश या दोघांना उतरविले व तो आपल्या घरी गेला. त्याच रात्री सदर खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दिवसापासून सतीश हा गायब होता, मात्र त्याची बेपत्ता झाल्याची रितसर तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. 

वडिलांनाच आढळला मृतदेह

सदर मृतदेह असलेल्या साकवाजवळ मयत सतीश परवार याचे घर आहे. काहीतरी कुजण्याचा उग्र दुर्गंध येत असल्याने सतीश याचे वडिल गुरुदास परवार यांनी दुर्गंधी येत असलेल्या दिशेने जाऊन पाहिले असता त्यांना मृतदेह दिसला. सदर मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. तसेच त्याचा चेहरा उद्धवस्थ झाला होता. पण अंगावरील कपडे व इतर वस्तू यावरून वडिलांनी सदर मृतदेह ओळखला व त्यानंतर लागलीच पोलीश नियंत्रण कक्षाला संपर्क साधून या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

30 मीटर अंतरावर झाटापट व रक्ताचे डाग

मृतदेह सापडलेल्या साकवापासून जवळच तीस मीटर अंतरावर जमिनीवर झटापट झाल्याचे निशान आढळून आलेले आहेत. तसेच त्याच ठिकाणीएक दगड आढळून आलेला असून त्यावर रक्ताचे डाग आहेत. तेथेच सतीश याने परिधान केलेल्या टीशर्टचा तुकडाही सापडला आहे. याच ठिकाणी सतीश याची मारेकरयांबरोबर झटापट झाली असावी व तेथेच त्या दगडाने ठेचून मारून नंतर साकवाखाली लवपले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

कलोत्सवात भांडण झालेल्या युवकांचा शोध

मयत सतीश व त्याचे मित्र हे म्हावळींगे येथे कालोत्सवाला गेले असता तेथे त्यांचे कोणाशीतरी भांडण झाले होते. ते युवक कोण ?  याचा तपास पोलीस करत आहेत. या युवकांचा या खून प्रकरणाशी संबंध आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे. सतीशच्या मृतदेहावरच त्याच्या कुत्र्यालाही ठार मारून टाकण्यात आले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. गणेश रावळ व सुरज आसवे या त्याच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून खुनाचा गुन्हाही नोंद करण्यात आला आहे, असे निरीक्षक चिमुलकर यांनी सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!