|Monday, July 31, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओबामांनी ट्रम्प यांना दाखविला ‘मार्ग’ओबामांनी ट्रम्प यांना दाखविला ‘मार्ग’ 

राष्ट्राध्यक्ष या नात्याने अंतिम संबोधन :  कुटुंबीयांचा उल्लेख करताना झाले भावुक, नागरिकांचे मानले आभार

  वृत्तसंस्था/ शिकागो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने बराक ओबामा यांनी शिकागो येथे आपले अंतिम भाषण केले. या भाषणादरम्यान ओबामांनी मागील 8 वर्षांतील कामगिरी मांडली. ओबामांनी नाव न घेता अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना लक्ष्य केले आणि लोकांशी सहिष्णू बनण्यासोबतच वंशवादाला प्रोत्साहन न देण्याचे आवाहन केले. पत्नी मिशेल आणि मुलींचे आभार मानतेवेळी ओबामांचे डोळे पाणावले. ओबामांचा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपणार आहे. याचदिवशी ट्रम्प नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथग्रहण करतील.

आपल्या अंतिम भाषणात ओबामांनी पत्नी मिशेल आणि मुलींचा उल्लेख केला, तेव्हा त्यांना रडू कोसळले. “मागील 25 वर्षांमध्ये मिशेल फक्त माझी पत्नी किंवा माझ्या मुलींची आई नव्हे तर उत्तम मैत्रिण बनली. मिशेलने मला गर्वाची अनुभूती दिली, मी जीवनात जे काही केले, त्यापेक्षा मालिया आणि साशा यांचा पिता असल्याचा गर्व मला सर्वाधिक आहे’’ असे भावुक उद्गार ओबामांनी यावेळी काढले.

भाषणाच्या प्रारंभी ओबामांनी स्वतःला एक उत्कृष्ट राष्ट्राध्यक्ष बनविण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले. आपले प्रशासन शांततापूर्वक पद्धतीने सत्ता सोपवेल असे आश्वासन आपण डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ट्रम्प लक्ष्य

ओबामांनी नाव न घेता ट्रम्प यांना लक्ष्य केले. आम्हाला शिक्षण, आरोग्य क्षेत्रातून भेदभाव संपवावा लागेल. हीच आमची घटना आहे. वंशीय भेदभाव समाजासाठी नेहमीच विभाजनकारी सिद्ध होतो असे म्हणत ओबामांनी लोकांना सहिष्णू बनण्याचे आवाहन केले. आमचा विरोधक देखील सत्य बोलू शकतो हे समजू शकले नाही तर आम्ही असेच एकमेकांवर वार करत राहू असे वक्तव्य ओबामांनी यावेळी केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक मोहिमेपासून आतापर्यंत प्रवासी आणि विशेषकरून मुस्लिमांना लक्ष्य केले आहे.

लोकशाहीच अमेरिकेचे सामर्थ्य

ओबामांनी लोकशाहीलाच अमेरिकेचे सामर्थ्य ठरविले. आज चीन आणि रशियासारखे देश जगात अमेरिकेची जागा घेऊ शकत नाहीत, कारण आमची लोकशाहीच आमचे सामर्थ्य आहे. ऑरलँडो आणि बोस्टन येथे झालेले हल्ले धार्मिक कट्टरता किती धोकादायक असू शकते हे दर्शवितात. फक्त कायदे पुरेसे नसून लोकांची मने बदलली गेली पाहिजेत असे उद्गार ओबामांनी काढले.

आयएसचा होणार खात्मा

लवकरच दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा खात्मा होईल. मागील 8 वर्षात कोणतीही विदेशी दहशतवादी संघटना अमेरिकेच्या भूमीवर हल्ला करू शकलेली नाही. आम्ही हजारो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे, ज्यात ओसामा बिन लादेन देखील सामील आहे. अमेरिकेला नुकसान पोहोचविणाऱयांना सुरक्षित राहू दिले जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुलांना सुविधा द्याव्या लागणार

प्रवासींच्या मुलांसाठी गुंतवणूक करावी, कारण ते देखील अमेरिकेच्या प्रगतीत भागीदारी करतील. दीर्घकाळापासून राहणारे प्रवासी त्यांचे अमेरिकन लोकांशी संबंध चांगले बनले आहेत हे जाणतात असा दावा ओबामांनी केला.

मुस्लिमांसोबत भेदभाव नाही

अमेरिकेत वंशवाद अव्यवहार्य आहे. आम्ही मागील 8 वर्षात कधीही मुस्लिमांसोबत भेदभाव केला नाही. कोणत्याही समुदायाला घाबरण्यापेक्षा प्रत्यक्षात आम्ही जागरुक होण्याची गरज आहे अमेरिकेत मुस्लिमांना कोणताही धोका नाही. अमेरिकन आणि मुस्लीम असा कोणताही फरक केला जाणार नसल्याचे प्रतिपादन ओबामांनी आपल्या अंतिम भाषणात केले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!