|Friday, July 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मल्ल्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेशमल्ल्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश 

अपत्यांना 273 कोटी हस्तांतरित केल्याचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हजारो कोटीच्या कर्जाची थकबाकी करून विदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्या यांच्यावर बँकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आपल्या अपत्यांना 273 कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा आरोप केला. या प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना 3 आठवडय़ात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 2 फेब्रवारी रोजी होईल.

न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि ए.एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. बँक समूहाच्या आरोपाच्या उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे न्यायालयाने मल्ल्या यांना सांगितले. मल्ल्या यांनी आपल्या अपत्यांना 273 कोटी रुपये हस्तांतरित करून कर्नाटक उच्च न्यायालय आणि कर्जवसुली आयोगाच्या (डीबीटी) आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप बँकांचे वकील श्याम दीवान यांनी न्यायालयासमोर केला.

मल्ल्या आणि त्यांच्या कंपन्यांवर बँकांची 6200 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. अशा स्थितीत ही रक्कम अपत्यांना हस्तांतरित करण्याऐवजी बँकेत जमा केली जाणे आवश्यक होते असे दीवान यांनी म्हटले. मल्ल्या यांना 273 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी बँकांनी न्यायालयाला केली. मल्ल्या यांच्या मालमत्तांच्या लिलावाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने बँकांची थकबाकी संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत.

 

हजारो कोटीच्या कर्जाची थकबाकी

मल्ल्या यांच्यावर 17 भारतीय बँकांच्या कर्जाची 6200 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यांच्याविरोधात दोन अजामिनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आली आहेत. मागील वर्षाच्या मार्चपासून लंडनमध्ये वास्तव्य करणाऱया मल्ल्यांकडून कर्जवसुली करण्याप्रकरणी बँकांना मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बँका या थकबाकीदार उद्योजकाची मालमत्ता विकून कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मल्ल्यांनी बँकांना तडजोडीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र बँकांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!