|Monday, July 31, 2017
You are here: Home » क्रिडा » पंजाब रॉयल्सची युपी दंगलवर मातपंजाब रॉयल्सची युपी दंगलवर मात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंजाब रॉयल्सने विजयी प्रो कुस्ती लीगमधील विजयी घोडदौड कायम ठेवत उत्तर प्रदेश दंगलचा 5-2 असा पराभव केला. पंजाबचे चार लढतीतून 6 गुण झाले असून ते आघाडीवर आहेत.

येथील खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियमवर या लीगमधील लढती सुरू असून पंजाबने युपीविरुद्धच्या लढतीतील पहिला सामना गमविल्यावर पुढच्या तीन सामन्यांत सलग विजय मिळविले. जयपूर निंजा, मुंबई मऱहाठी व हरियाणा हॅमर्स प्रत्येकी 4 गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत. मात्र हरियाणा व जयपूरला मुसंडी मारण्याची चांगली संधी आहे. कारण त्यांचे अनुक्रमे दोन व तीन लढती झाल्या आहेत. युपी दंगलने तळाचे स्थान कायम राखले असून आतापर्यंतच्या तीनही लढती त्यांनी गमविल्या आहेत.

पंजाबचा कर्णधार ब्लादिमिर खिंचेगॅश्विलीने नाणेफेक जिंकली आणि महिलांचा 58 किलो गट ‘ब्लॉक’ केला तर युपी दंगलची कर्णधार एलिस्टा यांकोव्हाने पुरुषांचा 97 किलो गट ब्लॉक केला. ब्लादिमिरने पंजाबला शानदार सुरुवात करून देताना 57 किलो गटात 2013 चा वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यजेत्या अमित दाहियाचा 6-2 असा पराभव केला. या सामन्यात ब्रेकपर्यंत ब्लादिमिरने अमितला खाली घेत 4-0 अशी आघाडी आणि दुसऱया फेरीत त्यात आणखी दोन गुणांची भर घातली. शेवटच्या दोन मिनिटांत अमितने आक्रमक धोरण अवलंबल्याने ब्लादिमिरने यावेळी बचाव करण्याचेच काम केले. पण अनुभवाचा उपयोग करीत अमितचे हल्ले त्याने व्यवस्थित परतवून लावले. अमितने शेवटच्या काही सेकंदात आक्रमण आणखी तेज करून त्याला खाली घेत 2 गुण मिळविले.

यांकोव्हाने युपी दंगलला बरोबरी साधून देताना महिलांच्या 48 किलो गटात पंजाबच्या निर्मला देवीवर 2-1 असा विजय मिळविला. निर्मलाने पहिल्या फेरीतच आघाडी घेतली आणि बराच वेळ टिकविली होती तेव्हा ती यांकोव्हाला पराभवाचा धक्का देणार असेच वाटले होते. पण निर्मलाने हालचाली करण्यास विलंब केल्याने पंचांनी यांकोव्हाला एक गुण दिला. नंतर पंजाबने निषेध केल्यामुळे त्यांना दंड म्हणून यांकोव्हाला आणखी एक गुण मिळाला आणि ती विजयी झाली.

पुरुषांच्या 74 किलो गटात जितेंद्रने पंजाबला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्याने युपी दंगलच्या टॅरियल गॅप्रिन्डाश्विलीवर 6-1 अशी एकतर्फी मात केली. पंजाबची नायजेरियन मल्ल ओडुनायो अदेक्युरोयेने महिलांच्या 53 किलो गटात युपीच्या पिंकीचा तांत्रिक गुणांच्या आधारे पराभव करीत पंजाबला 3-1 असे आघाडीवर नेले. सामना थांबवण्यात आला तेव्हा ओडुनायो 16-0 अशी आघाडीवर होती. रशियाच्या इल्यास बेकबुलातोव्हने युपीच्या आंद्रे क्विटकोवस्कीचा 65 किलो गटात 6-3 असा पराभव करून दोन सामने बाकी असतानाच पंजाबचा विजय निश्चित केला.

माजी आशियाई चॅम्पियन अमित धनकरने युपीसाठी दुसरा विजय मिळविला. 70 किलो गटातील सामन्यात त्याने पंजाबच्या पंकज राणाचा 13-5 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱया फेरीत धनकर व राणा यांच्यात 4-4 अशी बरोबरी झाली होती. पण धनकरने चमकदार प्रदर्शन घडवित ही लढत 13-5 अशी एकतर्फी जिंकली. शेवटच्या सामन्यात पंजाबच्या व्हॅसिलिसा मार्झालियुकने महिलांच्या 75 किलो गटात युपीच्या मारिया मामाशुकवर 3-1 अशी मात करून पंजाबला ही लढत 5-2 अशा फरकाने जिंकून दिली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!