|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » िजल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी उडणार राजकीय धुळवड

िजल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी उडणार राजकीय धुळवड 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली असून निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मागील निवडणुकीत युती केलेल्या शिवसेना, भाजपने रत्नागिरी जिह्यात स्वबळाची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बहुजन विकास आघाडीला बरोबर घेऊन निवडणुकीला समोर जाण्याची शक्यता आहे. नवीन रचनेनुसार जिल्हा परिषदेच्या 57 जागांऐवजी 55 जागांसाठी राजकीय पक्ष झुंजणार आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरु केली होती. बहुतांश ठिकाणी उमेदवारही निश्चित झाले आहेत. त्यांच्या प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण झाली आहे. सर्वांनाच आचारसंहिता लागू होण्याची प्रतिक्षा होती. जुन्या रचनेनुसार जिल्हा परिषदेच्या 57 जागा होत्या. लोकसंख्येचा विचार करुन नवीन संरचनेत दोन गट रद्द झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदे 55 सदस्य निवडून येणार आहेत. संगमेश्वर आणि मंडणगड येथील दोन गट रद्द झाले आहेत. सध्या जिल्हा परिषदेवर शिवसेना, भाजपची सत्ता आहे. त्यात शिवसेनेकडे 31 सदस्य तर भाजपचे 8 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 सदस्य, तर बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

आचारसंहिता लागू होत झाल्यानंतर निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्याची धुळवड खऱया अर्थाने गावागावात उडणार आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये मुसंडी मारली आहे. तसेच गेल्या तीन वर्षात राज्यात घडलेल्या बदलांमुळे भाजपकडूनही पाय रोवण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. नगर परिषद निवडणुकीत राज्यस्तरावर युतीचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. मात्र रत्नागिरी जिह्यात हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. तीच री या निवडणुकीतही ओढली जाणर असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

युती फुटणार असली तरी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी कायम राहण्याची शक्यता आहे. दापोली, खेड, गुहागर, मंडणगड, चिपळुणात राष्ट्रवादीने मजबूत पाय रोवले आहेत. जिह्याच्या दक्षिण पट्टयातील शिवसेनेत अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत निश्चितच उमटण्याची शक्यता राजकीय वर्तूळात व्यक्त होत आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे, त्यावर तोडगा काढणे अशक्य असल्याचेच चित्र आहे. दुसरीकडे चिपळूणातील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याचा थोडा परिणाम होऊ शकतो.

भविष्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेऊन राष्ट्रवादीने वाटचाल सुरु ठेवली आहे. आमदार भास्कर जाधव, संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला राष्ट्रवादी समोर जाणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार नीलेश राणे यांच्यावर आघाडीचे निर्णय होतील. सध्याच्या स्थिती काँग्रेसची अवस्था जिह्यात अत्यंत बिकट आहे. याचा विचार करता आघाडीत बिघाडी होईल, असे वाटत नाही. त्यांच्या जोडीला बविआची साथ मिळेल, असे चित्र काही तालुक्यांमध्ये दिसत आहे. एकूणच आचारंसहिता लागल्यानंतर बिगुल वाजले पण युती, आघाडीचे काय होणार यावरच निकालांचे ठोकताळे अवलंबून राहणार आहेत.