|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नीतेश राणेंची सेन्सॉरशिप सिंधुदुर्गात चालू देणार नाही!

नीतेश राणेंची सेन्सॉरशिप सिंधुदुर्गात चालू देणार नाही! 

कुडाळआमदार नीतेश राणे यांची सेन्सॉरशिप जिल्हय़ात शिवसेना चालू देणार नाही, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

जिल्हय़ात कोणता कार्यक्रम कोणी घेऊ नये हे दादागिरीच्या जोरावर ते ठरवत असतील, तर शिवसैनिक ते हाणून पाडतील, असे सांगत कणकवली व मालवणमध्ये नाटय़प्रयोगांवेळी लोकांनीही तीच भूमिका घेतली. आता कुडाळमध्येही नाटक यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

            प्रथम गांधीवादाचा स्वीकार करून तसे वागा!

‘हे राम नथुराम’ नाटकाला नीतेश राणेंनी विरोध करून आपल्या परवानगीशिवाय जिल्हय़ात काही होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली असेल, तर ते शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. त्यांनी प्रथम गांधीवादाचा स्वीकार करून तसे वागण्याचा प्रयत्न करावा, असा टोलाही त्यांनी हाणला.

                 बाहेरून लोक आणावे लागले!

नुकत्याच झालेल्या चारपैकी तीन नगरपालिकांमध्ये सेना-भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले व सत्ताही आली, असे सांगून राणे यांनी सेनेच्या हिताचा विचार करण्यापेक्षा नाटक बंद करण्यासाठी जिल्हय़ातील कार्यकर्ते त्यांना मिळाले नसल्याने बाहेरून लोक आणावे लागले. स्थानिक नगरसेवकही या आंदोलनात सहभागी झाले नाहीत, याचा विचार करावा व उत्तर शोधावे, असे नाईक म्हणाले.

            प्रकल्पग्रस्तांसाठी गडकरींची भेट नौटंकी!

राणेंनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे वाचनात आले. ही त्यांची नौटंकी आहे, असा आरोप करून नाईक म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचा मोबदला यापूर्वीच निश्चित झाला असून त्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच तो त्यांच्या खात्यात जमा होईल. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे अभिवचन यापूर्वी गडकरी व खासदार विनायक राऊत यांनी दिले असून ते त्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे ते म्हणाले.

              रेडी बंदर पुन्हा ताब्यात येण्यासाठी प्रयत्न!

राणेंनी गडकरी यांची घेतलेली भेट महामार्ग प्रकल्पग्रस्तांसाठी नाही, तर रेडी येथील बंदर पुन्हा आपल्या ताब्यात यावे, यासाठी ती होती, अशी शंका सिंधुदुर्गवासियांच्या मनात येत असल्याचे नाईक म्हणाले.

                सेना-भाजपचीच सत्ता येणार!

नगरपालिका निवडणुकीत सेना-भाजपने चांगले यश मिळविले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत सेना-भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीसाठी तालुकास्तरावर युती करण्याबाबत भाजपशी चर्चा झाली आहे. एक-दोन तालुके सोडून अन्य तालुक्यांचे अहवाल प्रमोद जठार व आपल्याकडे आले आहेत. जठार व आपली बैठक होऊन प्राथमिक चर्चा केली आहे. युती होण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्ष प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

             रस्ता रुंदीकरण ः अतिक्रमण हटविण्याची गरज

कुडाळ पोलीस ठाणे ते पोस्ट कार्यालय दरम्यानचा रस्ता प्राधान्याने रुंदीकरण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी आपण चर्चा केली आहे. हे अतिक्रमण काढण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱयांनी अतिक्रमण हटविले, तर रस्ता रुंदीकरण व गटाराचे काम करण्यात येईल, असे नाईक म्हणाले. याबाबत कुडाळ नगराध्यक्षांशी आपण चर्चा केली असून लवकरच एकत्र बसून चर्चा करून निर्णयाप्रत येऊ, असे ते म्हणाले. कुडाळ शहरातील कचऱयासाठी एमआयडीसीसह शासकीय जागांचा विचार सुरू आहे. शासनाकडून लवकरच जागा मिळेल, असे ते म्हणाले. संजय पडते, संजय भोगटे व संदेश प्रभू उपस्थित होते.