|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गरज भासल्यास सर्जिकल स्ट्राईक : लष्करप्रमुख

गरज भासल्यास सर्जिकल स्ट्राईक : लष्करप्रमुख 

पाक सीमेवर कारवाईचा पर्याय : जवानाच्या चित्रफिती प्रकरणी चौकशी

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी शस्त्रसंधी उल्लंघन प्रकरणी पाकिस्तानला इशारा दिला आहे. सध्या शस्त्रसंधी उल्लंघनात घट झाली आहे, परंतु यापुढे यात आणखी घट झाली नाही तर आमच्याजवळ सर्जिकल स्ट्राईकसारखे पर्याय आहेत असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. त्यांनी लष्करातील अधिकाऱयांकडून सेवा करवून घेण्याच्या जवानाच्या चित्रफितीवर देखील भूमिका मांडली. सोशल मीडियावर चित्रफित पोस्ट करण्याऐवजी जवानांनी अधिकाऱयांकडे तक्रार करावी. संबंधित जवानाच्या चित्रफितीप्रकरणी चौकशी केली जाईल असे रावत यांनी सांगितले.

लष्कराचा जवान लान्स नायक यज्ञप्रताप सिंग याने चित्रफित जारी करून अधिकाऱयांवर शोषणाचा आरोप केला होता. “पत्र लिहिल्यानंतर पीएमओकडून चौकशी करविण्याचा आदेश आला, परंतु मला कोर्ट मार्शलसाठी बोलाविले गेले. अधिकाऱयांचे बूट पॉलिश करविले जात असून त्यांच्या श्वानांना फिरविण्यासाठी आम्हाला पाठविले जात असल्याचे फक्त म्हटले होते’’ असे यज्ञप्रतापने चित्रफितीद्वारे सांगितले.

प्रत्येक मुख्यालयात तक्रारपेटी

सोशल मीडियावर चित्रफित पोस्ट करण्याऐवजी जवानांनी अधिकाऱयांकडे धाव घ्यावी. अंतर्गत बाब बाहेर नेली जाऊ नये. आम्ही जवानाच्या चित्रफितीची चौकशी करवू. लष्कर मुख्यालय आणि इतर कमांड्समध्ये शिफारस आणि तक्रारीसाठी बॉक्स आहेत. जवान तेथे आपले तक्रारपत्र टाकू शकतात. तक्रारी दूर करण्यासाठी कारवाई होईल. कोणत्याही जवानाला कोणतीही तक्रार असेल, तर तो थेट मला सांगू शकतो. जर जवान कारवाईने समाधानी झाला नाही तर त्याला दुसरे मार्ग अवलंबिण्याचा अधिकार आहे. 12 लाखापेक्षा अधिकचे आमचे लष्कर आहे. अनेकदा तक्रारी होतात, परंतु त्याचा उघडपणे तपशील दिला जाऊ शकत नाही. तक्रारदाराची ओळख उघड होऊ नये याची काळजी घेतली जाईल असे लष्करप्रमुखांनी म्हटले.

अनेक आव्हाने

सीमेवर आमच्यासमोर अनेक आव्हाने आहे. छुप्या युद्धाबाबत देखील आम्ही चिंतित आहोत. यामुळे देशाचे वातावरण बिघडविले जात आहे. आम्ही एक सशक्त लष्कर असून देश निर्माणासाठी बांधील असल्याचे जनरल रावत यांनी वक्तव्य केले.

चंदू चव्हाणाबाबत प्रक्रिया सुरू

पाककडून पकडण्यात आलेला जवान चंदू चव्हाणविषयी देखील त्यांनी वक्तव्य केले. पाक सरकारने चंदू त्यांच्याकडे असल्याची माहिती दिली आहे. कोणताही अधिकारी परत आणण्याची एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेचे अनुसरण केले जाईल असे रावत यांनी म्हटले.