|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संक्रांत सणासाठी शहर सज्ज

संक्रांत सणासाठी शहर सज्ज 

प्रतिनिधी/ बेळगाव

सुगड पूजन, बाजरीची मऊ आणि कडक भाकरी आणि भाज्या व चटण्यांच्या ताटांची देवाण-घेवाण करत शुक्रवारी भोगी साजरी झाली आणि संक्रांतीसाठी शहर सज्ज झाले. व्हॉट्स ऍपवरून संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण गुरुवारपासूनच सुरू झाली. यंदा तर भोगीच्या ताटाचे चित्र पाठवून भोगीच्याही शुभेच्छाही देण्यात आल्या.

संक्रांतीला सुगड पुजले जाते. त्यामुळे बाजारात सुगड दाखल झाली आहेतच. वेगवेगळय़ा भाजांच्या खरेदीबरोबरच सुगडांचीही खरेदी झाली. सुगडात तांदूळ घालून त्याच्यावरती असलेल्या मातीच्याच झाकणात तिळगुळ घालून त्यांचे पूजन करण्यात आले. बाजारपेठेत तर सर्वत्र शहर आणि उपनगरातसुद्धा तिळगुळाचे स्टॉल सजलेले आहेत. संक्रांतीला गुळपोळी करण्याचा रिवाज आहे. मात्र आता पुरणपोळी, शेंगापोळीबरोबर गुळपोळीसुद्धा बाजारात मिळत आहे. त्यामुळे नोकरदार महिलांची चांगलीच सोय झाली आहे. संक्रांत शनिवारी आली आहे. बाजाराचा दिवस त्यातच अर्धा दिवस सुटी आणि दुसरे दिवशी रविवार. त्यामुळे महिला वर्गाला निवांतपणाने सणाचे काम करता येणार आहे. तर बालचमुला सुटीचा आनंद घेत तिळगुळ वाटता येणार आहेत.

दरम्यान, मठ गल्ली येथील मनोहर यांचे कुटुंब वर्षानुवर्षे घरी तिळगुळ व तिळाचे दागिने तयार करत आले आहेत. हे कुटुंब मोठय़ा प्रमाणात घरीच तिळगुळ तयार करून विक्री करत आहेत. त्याच बरोबर तिळगुळाचे दागिनेही तयार करत आहेत. या घरातही पुरुष आणि महिला मिळून तिळगुळ व हलवा तयार करतात.

Related posts: