|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 26 गाळेधारकांना एकाच मीटरवरून वीज

26 गाळेधारकांना एकाच मीटरवरून वीज 

मालवण मालवण मच्छीमार्केट मंडईतील तब्बल 26 व्यापारी गाळय़ांना एकाच मीटरवरून वीजपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनीकडे वारंवार मागणी करूनही व्यापारी वर्गाला वैयक्तिक मीटर देण्यात आलेला नसून हा प्रकार गेली आठ वर्षे सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही व्यापारी वर्गाला वैयक्तिक मीटर न देता ज्याच्या नावे मीटर आहे, त्यालाच उलट नोटीस काढण्याचा प्रकार वीज कंपनीने केला आहे. त्यामुळे याप्रकरणी सतीशचंद्र सादये यांनी वरिष्ठ अधिकाऱयांकडे दाद मागितली आहे.

  मालवण पालिकेने शहरातील मच्छीमार्केटचे नूतनीकरण केल्यानंतर प्रत्येक गाळेधारकाबरोबर केलेल्या करारात स्पष्टपणे प्रत्येकाने स्वतः वीज मीटर घेण्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे व्यापारी वर्गाने वीज कंपनीकडे अर्जही केले आहेत. मात्र, वीज कंपनीने एकच मीटर बसवून सर्व व्यापाऱयांना वीजपुरवठा केला आहे. एका मीटरवरून इतरांना सब मीटरही देण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे गेली आठ वर्षे सर्व व्यापारी सहकार्यातून वीज मीटरचे बिल भरत आहेत. मात्र, आता वीज कंपनीने या व्यापारी वर्गाला ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी नोटीस काढली आहे. ही नोटीस ज्यांनी वीजजोडणीसाठी पालिकेकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केली, त्या सतीशचंद्र वासुदेव सादये यांना. कारण त्यांना येथील गाळा क्र. 13 या भाडेतत्वावरील गाळय़ामध्ये विद्युत जोडणीकरिता पालिकेने ना हरकत दाखला दिला आहे म्हणून.

वीज वितरण आठ वर्षांनी जागे

 वीज वितरणने पाठविलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे, मालवण मच्छीमार्केटच्या इमारतीत सद्यस्थितीमध्ये 20 ते 25 व्यावसायिक गाळे आहेत. अन्य गाळे बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत हे मच्छीमार्केट इमारतीला विद्युत पुरवठा करणाऱया रोहित्रावर विद्युत भार अधिक आहे. या रोहित्रावर अन्य घरगुती व व्यावसायिक विद्युत जोडण्या असल्याने सद्यस्थितीत या रोहित्रावरून नवीन विद्युत जोडण्या देणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नाही. आपण 20 ते 25 गाळे व मच्छीमार्केटची इमारत बांधताना तेथील विद्युत जोडणीसाठी रोहित्रांची तरतुद करणे आवश्यक होते. आपण आपल्या प्रस्तावित नवीन व सध्याचे गाळे यांच्या विद्युत जोडण्यासंदर्भात होणाऱया निर्णयाबाबत महावितरण कंपनीला माहिती द्यावी, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सादये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आम्हाला वैयक्तिक मीटर द्या

वैयक्तिक मीटर मिळण्यासाठी आम्ही वारंवार वीज कंपनीकडे मागणी करूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. आता उलट नोटीस पाठवून वीज कंपनी आम्हालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. नगरपालिकेचे व्यापारी गाळे असताना त्यावेळी ट्रान्सफॉर्मर घेण्याबाबत वीज वितरणने पत्रव्यवहार का केला नाही? असाही सवाल सादये यांनी केला आहे.