|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » गुजरातकडे पहिल्यांदाच रणजी जेतेपद

गुजरातकडे पहिल्यांदाच रणजी जेतेपद 

अंतिम लढतीत मुंबईवर 5 गडय़ांनी मात, सामनावीर पार्थिव पटेलचे दमदार शतक, जुनेजाचे अर्धशतक

वृत्तसंस्था/ इंदोर

कर्णधार पार्थिव पटेलने झळकवलेल्या ‘धडाकेबाज मॅचविनिंग’ शतकाच्या बळावर गुजरातने गतविजेत्या मुंबईला 5 गडय़ांनी पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रणजी चॅम्पियन बनणारा तो 17 वा संघ आहे. 66 वर्षांपूर्वी 1951 मध्ये त्यांनी या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवित सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती तर 41 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या मुंबईची ही उपविजेतेपद मिळविण्याची पाचवी वेळ आहे. 1990-91 मध्ये त्यांनी शेवटचे उपजेतेपद मिळविले होते. पार्थिव पटेलला सामनावीराचा बहुमान मिळाला.

मुंबईला पहिल्या डावात 228 धावांत गुंडाळल्यानंतर गुजरातने 328 धावा जमवित पहिल्या डावात मुंबईवर 100 धावांची आघाडी मिळविली. पण मुंबईने दुसऱया डावात सुधारित प्रदर्शन करीत 411 धावा जमवून गुजरातसमोर 312 धावांचे विजयाचे आव्हान दिले होते. संघातील सर्वाधिक वय असणारा खेळाडू पार्थिव पटेलने 196 चेंडूत 143 धावांची आक्रमक खेळी करीत गुजरातला पहिल्या रणजी करंडक जेतेपदाचा मान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पहिल्या डावातही त्याने 90 धावांची खेळी केली होती. रणजी अंतिम लढतीतील चौथ्या डावात झळकवलेले त्याचे हे शतक दीर्घकाळ स्मरणात राहणारे असेच आहे.

पार्थिवचे संस्मरणीय शतक

चिराग गांधीने पॉईंटच्या दिशेने ठाकुरला चौकार ठोकून विजय साकार केल्यावर पार्थिवसह गुजरातच सर्व खेळाडूंनी जल्लोष करीत आनंद साजरा केला. पार्थिवच्या चमकदार खेळीमुळे राष्ट्रीय निवड समितीसमोर पेच निर्माण होणार आहे. नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आता पूर्ण तंदुरुस्त झाल्याने तो खेळण्यास सज्ज झाला आहे. पण पार्थिवने फलंदाजीत चमक दाखविली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत कोणाला संधी मिळते ते पाहणे मनोरंजक ठरेल. दोघेही इराणी करंडक लढतीत खेळणार आहेत. पार्थिवने आतापर्यंत 168 प्रथमश्रेणी सामने खेळले असून 24 चौकारांच्या मदतीने त्याने नोंदवलेले 25 वे शतक कारकिर्दीतील सर्वांत मोलाचे ठरले आहे. मुंबईविरुद्धचे त्याचे हे पाचवे शतक आहे.

जुनेजा-पार्थिवची शतकी भागीदारी

बिनबाद 47 या धावसंख्येवरून गुजरातने शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू केला. पांचाळ कालच्याच 34 धावांवर बाद झाला तर गोहेल 21 धावा काढून बाद झाला. भार्गवर मेराई देखील (2) झटपट बाद झाल्याने गुजरातची स्थिती 3 बाद 89 अशी झाली. पण पार्थिव पटेल आणि मनप्रीत जुनेजा ही पहिल्या डावातील जोडी पुन्हा जमली आणि चौथ्या गडय़ासाठी 116 धावांची भागीदारी करून संघाचे आव्हान जिवंत ठेवले. जुनेजाने दुसऱया डावातही अर्धशतकी खेळी करताना 115 चेंडूत 8 चौकारांसह 54 धावा केल्या. पटेलने नंतर रुजुल भटसमवेत आणखी 94 धावांची भर घालत संघाला विजयासमीप आणले. पण संघाला आणखी 13 धावांची गरज असताना तो बाद झाल्यावर भट्ट व चिराग गांधी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करीत जेतेपद निश्चित केले. भट्ट 27 तर गांधी 11 धावांवर नाबाद राहिले. त्यांनी 89.5 षटकांत 5 बाद 313 धावा जमविल्या. पहिल्या डावातील नीरस फलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण यांचा फटका मुंबई संघाला बसला. चौथ्या डावात सर्वाधिक धावा जमवित जेतेपद मिळविण्याचा विक्रमही गुजरातने नोंदवला. यापूर्वी 1937-38 मध्ये हैदराबादने नवानगरविरुद्ध यशस्वी पाठलाग करीत 310 धावांचा विक्रम नोंदवला होता.

गुजरात संघाने हळूहळू प्रगती करीत रणजीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. गेल्या मोसमात त्यांनी 50 षटकांचा विजय हजारे करंडक तर त्याआधीच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडकही पटकावला आहे. मुंबई संघात गुणवंत खेळाडूंचा भरणा होता. पण गुजरातकडे पार्थिव व आरपी सिंग यांच्या रूपात दोन अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. त्यांचा अनुभव संघाला खूपच लाभदायक ठरला आहे. 

संक्षिप्त धावफलक : मुंबई पडाव 228, गुजरात प.डाव 328, मुंबई दु.डाव 411, गुजरात दु.डाव 89.5 षटकांत 5 बाद 313 (पार्थिव पटेल 196 चेंडूत 24 चौकारांसह 143, जुनेजा 115 चेंडूत 54, प्रियंक पांचाळ 47 चेंडूत 34, भट्ट ाdनाबाद 27, गोहेल 21, गांधी नाबाद 11, अवांतर 21, बलविंदर संधू 2-101, नायर 1-31, ठाकुर 1-90, हेरवाडकर 1-17).

 

Related posts: