|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मार्लेश्वर-गिरीजा देवीचा विवाह सोहळा थाटात

मार्लेश्वर-गिरीजा देवीचा विवाह सोहळा थाटात 

धीरेंद्र मांजरेकर / देवरुख

पारंपरिक मंत्रविधी, सनई-चौघडय़ाच्या सुरात मंगलाष्टकांच्या व श्रीदेव मार्लेश्वर – गिरीजादेवीच्या जयघोषात कुमकरी, स्वामीजी मानकरी, वऱहाडी आणि लाखो भाविकांच्या साक्षीने श्रीदेव मार्लेश्वर आणि गिरीजा देवी यांचा विवाह सोहळा मोठय़ा धुमधडाक्यात पार पडला.

लग्न सोहळय़ात हिंदू धर्मात लिंगायत शास्त्रानुसार विवाहप्रसंगीचे सर्व पारंपरिक विधी दिमाखदार सोहळय़ाने पार पडले. यात्रोत्सवानिमित्त 1 जानेवारी 2017 या नूतन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. देशाच्या कानाकोपऱयातून भाविक या यात्रोत्सवानिमित्त आले होते. जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाकडे पाहिले जाते. यात्रोत्सवाव्यतिरिक्त इतर दिवशीही मार्लेश्वर क्षेत्री भाविकांची मोठी गर्दी असते. सोमवार हा दिवस मार्लेश्वर देवाचा दिवस म्हणून मानला जातो.

आंगवलीतील मार्लेश्वर मठातून ढोल-ताशांच्या गजरात मुरादपूरचे भोईराज, कासारकोळवणचे वाजंत्री, चर्मकार प्रमुख मशाल घेवून मानकरी मठातून विवाह सोहळय़ासाठी बाहेर पडले. त्यामध्ये देवदेवतांच्या मुखवटय़ाचे श्री सोमेश्वर देवालयातून श्री मार्लेश्वर मठ आंगवली येथे मिरवणुकीने आगमन, श्री देवतांसह मंत्राभिषेक, बिटवार्जन, आरती, ध्यानधीवास, जलधिवास, वस्त्राधिवास, शिष्याधिवास, ध्वजारोहण, मंत्राधिवास, गणेशपूजन, पंचाचार्यपूजन, पुण्याहवाचन, नवग्रह पूजन, उमा महेश पूजन, दशदिकरवाल पूजन, चौसष्ट काव्यमती पूजन, सर्वतोभद्र जलमातृक, धृतमातृका पूजन, श्री देवतास तसेच शिवलिंगास रुद्राभिषेक व बिल्वार्चन होम, पूर्णाहुती मंत्राच्या जयघोषात श्ऱी देवतांची पुण्य प्रतिष्ठापना, आरती हळद स्नान घालणे, मानाचा साक्षी विडा भरणे, महाआरती, नवस फेडणे, महाप्रसाद, मुलगी दाखवणे, पसंती व पंचकलश मांडून लिंगायत धर्माप्रमाणे मार्लेश्वर-गिरीजा देवीचा लग्न सोहळा पार पडला.

विवाहानिमित्त सजला मार्लेश्वर परिसर

विवाह सोहळय़ानंतर महाप्रसाद, आहेर, नवस फेडणे, नवस बोलणे असे धार्मिक कार्यक्रमही पार पडून श्रीदेव मार्लेश्वर व कोंडगाव-साखरप्यातील गिरीजा देवीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. मार्लेश्वर संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. म्हसोळचे प. पू.चंद्रशेखर शिवाचार्य हे मार्लेश्वर विवाह सोहळय़ाचे प्रमुख होते.

कल्याणविधीच्या दुसऱया दिवशी येथील गावांमध्ये यात्रोत्सवानिमित्त यात्रा भरते. यावेळी मार्लेश्वर यात्रेला आलेले व्यापारी मारळ गावात येवून यात्रेत सहभागी होतात. येथील आजूबाजूच्या गावातील लोक या यात्रेत आवर्जून सहभागी होतात. संगमेश्वर तालुक्यातील तसेच अन्य विभागातीलही भाविक या यात्रोत्सवाचा आनंद लुटतात. आंगवली येथील मठात मार्लेश्वरची पालखी गेल्यानंतर श्रीदेवाची पालखी घरोघरी भेटीला जाते. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे.

मार्लेश्वर तिर्थक्षेत्राची साऱयांनाच भूरळ

सहय़ाद्री पर्वताच्या उंचच-उंच शिखरात वसलेले मार्लेश्वर तिर्थक्षेत्र अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान झाले आहे. दरवर्षी येणाऱया मकरसंक्रातीतील होणाऱया मार्लेशवर यात्रेला लाखो भाविकांची गर्दी लोटत असते. तसेच श्रावण महिन्यातही शिवपिंडावर अभिषेक करण्यासाठी भाविक येत असतात. मन प्रफुल्लित करणारा हळूवार गारवा, हिरवीगार वनराई, निरव शांतता तसेच ऐन पावसाळय़ात श्रावण महिन्यामध्ये डोळय़ात टिपून ठेवण्यासारखे निसर्गरम्य दृश्य यामुळे मार्लेश्वर तिर्थक्षेत्राची सगळय़ांनाच भूरळ पडते.

मंगळवारी होणार यात्रोत्सवाची सांगता

13 रोजी आंगवली येथील मार्लेश्वर मठात यात्रा पार पडली. विवाहपूर्व सर्व विधी येथे भक्तीभावाने पार पडले. या दिवशी रात्री 12 नंतर पालखी मार्लेश्वरकडे रवाना झाली. 14 रोजी दुपारी 1 वाजता मार्लेश्वर-गिरीजादेवीचा कल्याणविधी पार पडला. 15 रोजी रविवारी मारळ व बोंडये गावात यात्रा भरणार आहे. 16 रोजी पालखी दर्शना सोहळय़ाला सुरुवात होणार आहे. 17 रोजी मंगळवारी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

Related posts: