|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » झी मराठीवर दोन नव्या मालिकांचा प्राईम टाईम

झी मराठीवर दोन नव्या मालिकांचा प्राईम टाईम 

दर्जेदार मनोरंजनाचे नवे पर्व सुरू करताना नव्या वर्षाच्या प्रारंभाला ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या दोन नव्या मालिका झी मराठीवर सुरू होणार आहेत.

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपट आणि नाटय़सफष्टीतील हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत तर त्यांच्या जोडीला आहेत लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. येत्या 18 जानेवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ तर 10 वाजता ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवफद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असले तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसे प्रेम आहे तसाच या नात्यात एक खटय़ाळपणासुद्धा आहे. या वयातही राजाभाऊ मनाने अगदी तरुण आहेत आणि या मुद्यावरुन दोघांमध्ये प्रेमळ खटकेही उडतच असतात. राजाभाऊंचा हट्ट की मालतीने त्यांना तरुण म्हणावे आणि मालतीची इच्छा अशी की राजाभाऊंनी हा अट्टाहास सोडावा. या दोघांच्या याच खुसखुशीत नात्याची गंमत या मालिकेतून बघायला मिळणार आहे.    सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे या मालिकेची निर्मिती करणार असून त्याचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार आहे तर पटकथा आणि संवाद मधुगंधा कुलकर्णीचे असतील. यानिमित्ताने दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने जोडी म्हणून प्रथमच एकत्र येणार आहेत त्यामुळे मनोरंजनासोबतच दर्जेदार अभिनयाची जुगलबंदीही या मालिकेतून बघायला मिळेल. वय वर्षे 103 असणारी राजाभाऊंच्या आईची भूमिका नयना आपटे साकारत असून तरुणपणीच्या राजाभाऊच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि मालतीच्या भूमिकेत स्नेहा फाटक ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे.  

zee marathi

दुसरी मालिका आहे नकटीच्या लग्नाला यायचं हं… ही कथा आहे देशपांडे कुटुंबियांची. दामोदर निवास या एका जुन्या वाडय़ात एकत्र राहणारं हे कुटुंब. दामोदर देशपांडे यांच्या पश्चात या कुटुंबात चंद्रकांत आणि सुर्यकांत ही दोन मुले, मुलगी शैला आणि तिचा नवरा जयंता ही मंडळी एकत्र राहतात. यातील सुर्यकांत आणि विजूची मुलगी आहे नूपुर जिला सर्वजण लाडाने नकटू अशी हाक मारतात. याच नकटूची आणि तिच्या लग्नाची ही गोष्ट. या नूपुरचं लग्न या वाडय़ातच व्हावं ही दामोदररावांची शेवटची इच्छा होती. या लग्नानंतरच हा जीर्ण झालेला वाडा पाडावा आणि त्याजागी इमारत उभी करावी अशी त्यांची एक प्रकारची अटच. त्यामुळे आता सर्वांना घाई आहे ती नूपुरच्या लग्नाची. यासाठी त्यांच्या नजरेत एक मुलगा सुद्धा आहे तोही याच घरातला तो म्हणजे नूपुरची आत्या शैलाचा मुलगा नीरज. परदेशात असलेला नीरज घरातील एका समारंभानिमित्ताने भारतात येतोय आणि याचवेळी लग्नाची बोलणी करण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्य घेतात. नीरज परत येतो आणि त्याला ही लग्नाची लगबग लक्षात येते आणि तो या लग्नासाठी नकार देतो. खरं तर आजवर नीरजचीच स्वप्ने बघणारी नूपुर त्याच्या या निर्णयाने दु:खी होते त्यामुळे तिच्यासाठी मुलगा शोधण्याची जबाबदारी नीरज स्वत:वर घेतो. या मालिकेत नूपुरच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. याशिवाय मालिकेत संजय सुगावकर, पौर्णिमा तळवलकर, आसित रेडीज, वर्षा दांदळे, शकुंतला नरे, रागिनी सामंत, सोनाली पंडित, आनंदा कारेकर, अभिनय सावंत, अभिजीत आरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन केलं आहे गौतम कोळी यांनी. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांची पटकथा तर प्रल्हाद कुडतरकर यांचे संवाद आहेत.