|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ऑस्ट्रेलियाचे भावी इंजिनिअर्स अभ्यासासाठी निवजेत

ऑस्ट्रेलियाचे भावी इंजिनिअर्स अभ्यासासाठी निवजेत 

माणगाव‘इंजिनिअर विदाऊट बॉर्डर्स’ या इंटरनॅशनल संस्थेच्या ऑस्ट्रेलियन शाखेतर्फे ऑस्ट्रेलिया येथील इंजिनिअर्स विभागाचे वीस विद्यार्थी कुडाळ तालुक्यातील निवजे येथे शुक्रवारपासून अभ्यास दौऱयासाठी आले आहेत. 17 जानेवारीपर्यंत ते गावात राहणार असून तेथील जीवन पद्धती, राहणीमान व भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करणार आहेत. तेथील आवडलेल्या गोष्टी आपल्या देशात नेणे व येथे असलेल्या कमतरतेबाबत मत नोंदविणे, असा या अभ्यास दौऱयाचा उद्देश आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या धोरणानुसार इंजिनिअर व्हायचे असेल, तर लोकांना काय पाहिजे हे जाणून घेतले पाहिजे व नंतर प्रकल्प दिला पाहिजे. आपला प्रकल्प लोकांवर लादू नये, ही या प्रशिक्षणामागची भावना असल्याचे पुणे येथील अथेन्टिका संस्थेच्या सायली जोशी यांनी निवजे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

                     निवजे गावाची निवड

‘इंजिनिअर विदाऊट बॉर्डर्स’ या इंटरनॅशनल संस्थेच्या ऑस्ट्रेलियन शाखेच्या अलांटा कोली यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून अथेन्टिका संस्था व कुडाळ तालुक्यातील झाराप येथील भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवजे गावाची निवड करण्यात आली आहे.

              ‘बायोगॅस’ प्रकल्पाने प्रभावित

यापूर्वी त्यांचे हुबळी-कर्नाटक येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण झाले असून 49 विद्यार्थी ऑस्टेलियातून आले आहेत. पैकी कुडाळ तालुक्यातील माडय़ाचीवाडी येथे एक टीम व निवजे येथे दुसरी टीम आहे. दोन दिवस निवजे येथे त्यांनी कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, बायोगॅस, शेततळी व वायंगणी भातशेतीची पाहणी केली. ‘बायोगॅस’ या शेणावर चालणाऱया प्रकल्पाने अधिक प्रभावित केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

            ‘अतिथी देवो भव’ संकल्पना विद्यार्थ्यांना आवडली

या भागातील ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना खूप आवडली असून  लोकांशी ते समरस झाले आहेत. तेथील लोकांनी आपले काम सोडून वेळ दिला. परकीय असूनही घरात निवासाची व्यवस्था केली. तेथील विविध पदार्थही आवडीने दिले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

                   21 रोजी प्रोजेक्ट सादर करणार

या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन सरकारने शिष्यवृत्ती देऊन पाठविले आहे. संपूर्ण प्रशिक्षणानंतर सावंतवाडी येथील हॉटेल कोकण क्राऊन येथील कार्यक्रमात 21 जानेवारी रोजी ते अभ्यास दौऱयाचा प्रोजेक्ट सादर करणार आहेत. यावेळी निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, वासुदेव बिडये, सुधीर राऊळ, नीलेश पालव, गणेश जाधव, संतोष पिंगुळकर, दत्तप्रसाद सावंत, मार्यान डिसिल्वा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: