|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीच्या सुपुत्राला ‘टेक्निकल ऑस्कर’

सावंतवाडीच्या सुपुत्राला ‘टेक्निकल ऑस्कर’ 

सावंतवाडी : ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स ऍन्ड सायन्सतर्फे चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञानासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा टेक्निकल ऑस्कर पुरस्कार यंदा अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या परंतु ज्यांचे जन्मगाव सावंतवाडी आहे, अशा पराग हवालदार यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना 11 फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई प्रांतात वनखात्यात अधिकारी असलेल्या व त्यानंतर सावंतवाडीच्या अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या सावंतवाडीतील आत्मेश्वर तळीनजीक ज्यांचे घर आहे त्या कै. बाबा पाडगावकर यांचे पराग हवालदार नातू आणि त्यांची कन्या हेमा हिचे सुपुत्र होत.

1991 मध्ये खरगपूर आयआयटीमधून कॉम्प्युटर इंजिनियर बनून पुढील शिक्षणासाठी ते सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत दाखल झाले. खेळ आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील द्विमिती तथा त्रिमिती तंत्रज्ञानामध्ये फार मोठा पल्ला त्यांनी गाठला. स्पाईडरमॅन, ऍलिस इन वंडरलँड, मॉन्स्टर हाऊस, हॉटेल ट्रान्सिल्वानिया यासारख्या वैशिष्टय़पूर्ण व वेगळय़ा अशा अमेरिकेत निर्मिलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा खूप सुरेख, कौशल्यपूर्ण वापर केला आहे. अत्यंत कल्पकतेने केलेले छायाचित्रण, वेगळय़ा धर्तीचे व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग,
ग्राफिक्सचा अत्यंत खुबीने व चमत्कृतीपूर्ण केलेला वापर हे सर्व ज्या चित्रपटांना आवश्यक वाढते त्यांना पूरक व सुलभ होईल, असे तंत्रज्ञान हवालदार यांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे संगणकाच्या ज्या काही विविध भाषा आहेत त्यातले ते तज्ञ समजले जातात.

खरगपूर आयआयटीमध्ये अध्ययन करत असल्यापासून चित्रपट ऍनिमेशनच्या क्षेत्रात भरीव संशोधन करत त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले, प्रत्यक्षात उतरविले. आणि आपला हा प्रवास कसा योग्य दिशेने होता हे ‘टेक्निकल ऑस्कर’ या पुरस्काराच्या माध्यमातून सिद्धही केले आहे.

Related posts: