|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अखिलेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मायावतींकडून जोरदार टीका

अखिलेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मायावतींकडून जोरदार टीका 

वृत्तसंस्था/ लखनौ

अखिलेश यादव यांच्या कलंकित चेहऱयाला मुख्यमंत्री म्हणून निवडण्यापूर्वी जनतेने विचार करावा असे बसप प्रमुख मायावती यांनी वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात म्हटले. भाजपने आपल्या आश्वासनांचे एक चतुर्थांश प्रमाण देखील पूर्ण केले नाही. मोदींनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी स्वतःवर लिखित पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले. मायावतींनी केक न कापता वाढदिवस साजरा केला आणि कार्यकर्त्यांना तो साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले.

 

मायावतींनी मांडलेले मुद्दे

  1. भाजपने देशात गरीबी, महागाई संपविणार असे म्हटले होते. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले हाते. उत्तरप्रदेशच्या 22 कोटी जनतेत भाजपविरोधात चीड असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचा काळापैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदी लागू करण्यात आली, पक्षाचा खरा चेहरा लवकरच देशासमोर येईल असे त्यांनी म्हटले.
  2. आश्वासनानुसार काळ्या पैशाची माहिती मोदी देऊ शकले नाहीत. नोटाबंदीनंतर किती भ्रष्ट पकडले गेले हे देखील त्यांनी सांगितले नाही. केव्हा कोणती घोषणा करून मोदी नवे काही तरी बंद करतील अशी भीती जनतेत आहे. सीमेवर आधीपेक्षा अधिक जवान हुतात्मे झालेत. मोठय़ा संख्येत शेतकरी आत्महत्या करत आहेत. केंद्र यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
  3. डॉ. आंबेडकर यांच्या नावाखाली भाजपने जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. बाबासाहेबांचे नाव वापरल्याने आणि स्मारक बनविण्याच्या घोषणेने भाजपला लाभ होणार नाही. आंबेडकरांचे अनुयायी भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले.

4.केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे रोहित वेमुला प्रकरण आणि गुजरातमध्ये दलित शोषणाच्या घटना समोर आल्या. केदांने आरक्षण पाहता खासगी क्षेत्रांना अधिक प्रकल्प देण्यास प्रारंभ केला आहे. आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळालेला नाही आणि भाजप आता विरोधात काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

  1. काँग्रेस पक्ष सध्या कृत्रिम प्राणवायूवर चालत आहे. उत्तरप्रदेशात जनतेला वेगवेगळ्या प्रकारची काँग्रेसकडून प्रलोभने दिली जात आहेत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसने केवळ आश्वासने देण्याचेच काम केले आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसने 37 वर्षांपर्यंत सत्ता सांभाळली, काँग्रेसचा दावा जनता गांभीर्याने घेत नसल्याचे मायावतींनी म्हटले.