|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » सिंबो, बोर्नेस मॅरेथॉन विजेते

सिंबो, बोर्नेस मॅरेथॉन विजेते 

भारतीय महिला गटात महाराष्ट्राची ज्योती गावते अव्वल

प्रतिनिधी/ मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर रविवारी पहाटेपासून धावपटूंच्या उत्साहाने संचारला होता. बोचऱया थंडीत सुरू झालेल्या 14 व्या स्टँडर्ड चॅर्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या ज्योती गावते हिने भारतीय महिलांच्या फुल मॅरेथॉनमध्ये अव्वलस्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परदेशी पुरुष गटात टांझानियाच्या अल्फोन्स सिंबोने 42 किलोमीटरच्या शर्यतीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. परदेशी महिला विभागात केनियाची बोर्नेस किटुर ही पहिली आली. मुख्य स्पर्धेत केनियन धावपटूंचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले. वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण साधत अखेर मुंबईकरांनीही फिट अँड फाईनसाठी धाव घेतली.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीएसटी येथे 7.20 वाजता परदेशी पुरुष गटाच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. 42 किलोमीटरची ही शर्यत टांझानियाच्या अल्फोन्स सिंबोने दोन तास 9 मिनिटे 32 सेकंद अशी नोंदवत यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा मानकरी होण्याचा मान मिळवला. दुसऱया स्थानावर केनियाचा जोशुआ किपकोरीर राहिला. त्याने हे अंतर दोन तास 9 मिनिटे 50 सेकंदांत पार केले. केनियाचा इलिड बारंगेटुनी, केनियाचा जेकब चेसरी आणि इथिपोयिचा बोन्सा डिडा यांना अनुक्रमे तिसऱया, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विदेशी गटातील महिलांमध्ये केनियाच्या बोर्नेस किट्टुरने पहिले स्थान पक्के केले. तर इथोपियाची चॅल्टा टाफा आणि टिगिस्ट गर्मा यांनी दुसरे, तिसरे स्थान प्राप्त केले.

भारतीय पुरुषांच्या गटात बहादुरसिंग धोनी, टीएच लुआंग, इलाम सिंग, राहुल कुमार यांना मागे टाक खेता राम याने दोन तास 19 मिनिटे 51 सेकंद इतकी वेळ नोंदवली आणि पहिल्या क्रमांकाने बाजी मारली.

महिलांची फुल मॅरेथॉन जिंकणारी ज्योती गावते हिने आपल्यातील क्षमता दाखवून दिली. दुसरी आलेली प. बंगालच्या श्यामली सिंग हिला स्पर्धासरावासाठी फक्त 15 दिवसांची वेळ मिळूनही चांगली कामगिरी केली. तिसरी आलेली जग्मीत दोला हिने आपलीच सर्वोत्तम कामगिरी ब्रेक केली. 

ललिता बाबर, कविता राऊत यांनी यंदा स्पर्धेत सहभाग घेतला नसला तरी  महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिला धावपटूंनी सरस कामगिरी केली. मोनिका अत्रे हिने एक तास 19 मिनिटे 13 सेकंदांत अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. मीनाक्षी पाटील, अनुराधा सिंग, सिताबेन चरे आणि भारती दुधे यांनी सरसता दाखवली.

लक्ष्मण जी याने पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये वरचा क्रमांक प्राप्त केला. त्याने एक तास 5 मिनिटे 5 सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण केली. द्वितीय सचिन पाटील, तृतीय दीपक कुंभार, चौथा गोविंद सिंग आणि पाचवा शंकर थापा आला.