|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जलसंवर्धनाबाबत जनजागृती गरजेची

जलसंवर्धनाबाबत जनजागृती गरजेची 

प्रतिनिधी/ चिपळूण

जगाच्या नकाशावर देशाला उंचीवर न्यायचे असेल तर पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. संमेलनाबरोबरच कायमस्वरूपी जलसंवर्धनाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले.

येथील ब्राम्हण सहाय्यक संघ परिसरातील स्व. भवरलालची जैन नगरात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने आयोजित जलसाहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निसर्ग आपल्याला किती पाणी देतो आणि आपण त्याला परत किती करतो, हा देशाच्या दृष्टीने संशोधनाचा भाग आहे. सिंगापूरला मलेशियातून पाणीपुरवठा होतो. मात्र तेथे पाणी वाया जाऊ न देता त्यावर प्रक्रिया करून नवीन पाणी म्हणून वापरात आणले जाते, असे अनेक देश प्रक्रिया करून पाणी वापरात आणतात. मात्र आमच्या देशात ते होताना दिसत नाही. त्यामुळे आमची उंची जगाच्या नकाशावर फारच कमी आहे.

हे दहावे संमेलन आहे. त्यामुळे ही आमची वाटचाल असून आमचे ध्येय गाठण्यासाठी खूप लांबचा रस्ता आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे असून तसे झाले तरच निर्मळ, समृद्ध, बलशाली भारताचे चित्र उदयास येईल. भारतीय जलसंस्कृती मंडळ हे चित्र हस्तगस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. गेल्या 3 वर्षात बुलढाणा, मराठवाडा येथे पाणीप्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले होते. लोकांची वाताहत झाली होती. जनावरांच्या पाणी, चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र कुठेही याचा उद्रेक झाला नाही. त्यामुळे असा समजूतदारपणाही दाखवायला आपण शिकले पाहिजे. देशात सर्वच ठिकाणी नागरिकीकरण वाढते आहे, हे नाकारता येणार नाही. मात्र तेवढय़ा सुविधा आम्ही नागरिकांना देऊ शकतो का, याचा विचार करण्याची गरज आहे. चिपळूण शहराचा विचार केला तर घनकचरा, मलप्रवाह याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे अशा शहरातूनच त्यावर उपाययोजना झाल्या नाही तर आमच्या देशाची जागतिक उंची कशी वाढेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मी या देशाचा नागरिक आहे. त्यामुळे या जलसंमेलनातून पाण्याच्या नियोजनाच्या प्रेरणेची शिदोरी घेऊन जा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जलनियोजनासाठी प्रयत्न करणाऱया सहय़ाद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, नागपूरचे विनोद हंडे, धुळेचे संजय झेंडे, विजय जोगळेकर, डॉ. अनिल जोशी यांचा विशेष सत्कार डॉ. चितळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अरविंद जाधव, प्रकाश देशपांडे, डॉ. तानाजी चोरगे, प्रकाश राजेशिर्के, अशोक जाधव, जयंद्रथ खताते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय चितळे, तर आभार प्रकाश काणे यांनी मानले.