|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पेट्रोल चोरताना तीन मोटारसायकलींना आग

पेट्रोल चोरताना तीन मोटारसायकलींना आग 

प्रतिनिधी/ बेळगाव

समृद्धी कॉलनी अनगोळ येथे तीन मोटारसायकली व दोन सायकली जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पेट्रोल चोरण्याच्या प्रयत्नात असताना आगीचा हा प्रकार घडल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

समृद्धी कॉलनी अनगोळ येथील कृष्णा शट्टूप्पा चतूर यांच्या तळघरात ही घटना घडली आहे. केए 22 ईपी 5096, केए 22 एक्स 7146 व केए 22 ईके 7459 या तीन मोटारसायकलींबरोबरच दोन सायकलींही जळून खाक झाल्या आहेत. यापैकी एक मोटारसायकल उत्तम भरमाण्णा पाटील यांची आहे.

कृष्णा चतूर यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या घटनेत सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे. तळघरात उभी करण्यात आलेल्या मोटार सायकली व सायकली अज्ञातांनी पेटविल्या असल्याची फिर्याद दाखल झाली असली तरी पेट्रोल चोरटय़ांची ही करामत असल्याची दाट शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.

टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक बी. ए. जाधव त्या दिशेने तपास करीत आहेत. अनगोळ परिसरात घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनातील पेट्रोल काढण्याचे प्रकार वाढले आहेत. पेट्रोल चोरणारी टोळी अंधारात आपले काम साधते. तळघरात मोटारसायकलीतील पेट्रोल काढताना मोटारसायकली व सायकलींना आग लागली आहे.

बुधवारी कृष्णा चतुर यांच्या मोटारसायकलीतील पेट्रोल चोरीला गेले होते. समृद्धी कॉलनी परिसरात पथदीप नसल्यामुळे रात्री संपूर्ण परिसरात अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत घरासमोर उभी करण्यात आलेल्या वाहनांमधील पेट्रोल चोरण्यात येत आहे. गेल्या पंधरवडय़ात 25 हून अधिक वाहनांतील पेट्रोल चोरण्यात आले आहे.

Related posts: