|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मै इतना भी क्यू पि लेता हूँ ..!

मै इतना भी क्यू पि लेता हूँ ..! 

ओम पुरी जगातील दमदार अभिनेते : नसरुद्दिन शहा यांनी जागविल्या मित्राच्या आठवणी

पुणे / प्रतिनिधी

जगातील दमदार अभिनेते कोण याचे उत्तर ओम पुरी, हेच असून,  सगळ्यांनाच ते माहीत आहे, अशा शब्दांत जिवलग मित्र ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी ओम पुरी यांच्या हृद्य आठवणी सोमवारी जागवल्या. त्यांच्या चित्रपटातील ‘मै इतना भी क्यू पि लेता हूँ’ हा संवाद ऐकवतानाच त्यांच्याकडून भूमिका कशा साकारायच्या, समर्पित वृत्तीने काम करणे शिकलो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पिफ्फ बझारअंतर्गत ज्येष्ठ अभिनेते   नसरुद्दिन शहा यांनी ओम पुरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनिल झनकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

शहा म्हणाले, 1970 पासून आम्ही एकत्रपणे रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. गेली 46 वर्षे आमचा स्नेह होता. आमची भेट राष्ट्रीय अकादमीत झाली. माझे आणि त्याचे नाते हे गहिरे आणि गुंतागुंतीचे होते. ओम पुरी यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता. त्यांनी छोटय़ा भूमिकाही तेवढय़ाच ताकदीने पेलल्या. कुठली एक भूमिका पाहिजे, असा कधीही त्यांनी हट्ट धरला नाही. सिनेमातील ज्या भूमिका त्यांनी वठवल्या; त्या त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवल्या होत्या. गंभीर भूमिका त्यांनी केल्या. तेवढय़ाच ताकदीने त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ओम कॉरिडॉरमध्ये झोपायचा. एक चारपाई, त्यावर नीट अंथरलेली लुंगी, स्टोव्ह नाटकांच्या पटकथा आणि पुस्तके एका छोटाश्या कॉरिडॉरमध्ये राहणाऱया या व्यक्तीने मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे.

ओम पुरी यांचे डोळे आणि आवाज बोलायचा

ओम पुरी हे एफटीआयआयमध्ये यायला तयार नव्हते. एफटीआयआयमध्ये आल्यावर त्याचा चेहरा हा चित्रपटासाठी योग्य नाही, असेही हिणवले गेले. असे म्हणणेच मूळात हास्यास्पद आहे. त्याचा चेहरा म्हणजे लॅन्डस्केप होता. पण, त्याच्या अभिनयाने सगळेच गैरसमज दूर केले. भूमिकेत संवाद नसले, तरी डोळे आणि आवाज याच्यातून तो भूमिका जिवंत करायचा. सत्यजित रे यांच्याबरोबर त्याने काम केले. या एका गोष्टीबाबत त्याचा मी हेवा करीत राहीन, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केलया.

पाकिस्तानातही ओम पुरी प्रसिद्ध

ओम पुरी यांच्या व्यक्तिमत्व असे होते, की ते सगळीकडे प्रसिद्ध होते. याच व्यक्तिमत्वामुळे ते पाकिस्तानमध्येही रसिकप्रिय होते. इस्ट इज इस्ट या चित्रपटात त्यांनी जिया उल हक यांची भूमिकाही साकारली होती. ओम पुरी गेल्या काही वर्षापासून दुःखी होते. उत्तरार्धात त्यांच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित वळणे आली. जे त्यांच्या बाबतीत घडले ते कोणाच्या बाबतीतही घडू शकते. त्यामुळे त्याच्या ‘जाने भी दो यारो’ चित्रपटातील संवाद आठवत आहे, असे सांगत त्यांनी ‘मै इतना क्यू पि लेता हूँ,’ हा डायलॉग सादर केला. हा चित्रपट करणे म्हणजे एकप्रकारचे धाडसच होते, असेही त्यांनी सांगितले.

 

फोटो ओळीः पुणेः पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फिफ्फ बझार अंतर्गत ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी ओम पुरी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Related posts: