|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » देव्हारे आदर्श सोसायटी चेअरमनसह 14जणांवर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल

देव्हारे आदर्श सोसायटी चेअरमनसह 14जणांवर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल 

प्रतिनिधी/ मंडणगड

कर्जमाफी देताना शेतकऱयांची बोगस यादी सादर करून शासनाची दिशाभूल करून कर्जमाफी दिलेल्या 26 लाख 14 हजार 63 रुपयांच्या कर्जापैकी 2 लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी दापोली न्यायालयाच्या माध्यमातून बाणकोट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भातील तपासानंतर सोसायटीचे चेअरमन प्रकाश रामजी शिगवण, सचिव अशोक तुकाराम बैकर यांच्यासह एकूण 14 संचालकांविरोधात दापोली येथील सत्र न्यायालयात सोमवारी बाणकोट पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले.

  यासंदर्भात बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्याकडून दूरध्वनीवरुन मिळालेल्या माहितीनुसार प्रताप पांडुरंग बर्जे (पाचरळ) यांनी यासंदर्भात दापोली न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार शासनाने 2007-2009 या वर्षात शेतकऱयांना दिलेल्या कर्जमाफी व कर्ज परतफेड योजनेंतर्गत देव्हारे येथील आदर्श विविध कार्यकारी सोसायटीमधील 171 कर्जदार सभासदांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याने 26 लाख 14 हजार 63 रुपयांची कर्जमाफी मिळाली होती. यात काही लाभार्थ्यांना प्रत्यक्षात कर्ज दिले नसतानाही शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. फिर्यादीकडून या योजनेंर्तगत 1 लाख 61 हजार रुपये रक्कम वसूल करुन या रकमेचा संबंधितांनी अपहार केला अशी तक्रार दापोली न्यायालयाच्या माध्यमातून बाणकोट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. यानंतर बाणकोट पोलीस स्थानकाच्यावतीने वेळोवळी तपास करून संबंधितांची झाडाझडती घेण्यात आली आणि अखेर संबंधितांविरोधात बाणकोट पोलीस स्थानकात रजिस्टर क्र. 8/ 16मध्ये भादंवि कलम 420, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती सबळ पुरावे प्राप्त झाल्याने सोमवारी बाणकोट पोलिसांनी चेअरमन प्रकाश शिगवण, सचिव अशोक बैकर यांच्यासह सर्व संचालकांना ताब्यात घेऊन दापोली येथील न्यायालयात हजर करुन त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले. 

  यासंदर्भात फिर्यादीच्यावतीने दापोली न्यायालयात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करणारे वकील ऍड. अभिजीत गांधी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पोलिसांकडे वारंवार गाऱहाणे मांडूनही त्यांच्या अशिलास न्याय न मिळाल्याने न्यायालयात दाद मागतील व गैरव्यवहाराच्या आरोपात पोलिसांना तथ्य सापडल्याने संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हे दाखल होऊन दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. आता रिसतर केस चालून गुन्हा सिध्द झाल्यास संबंधितांना शिक्षा होऊ शकेल.