|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शैक्षणिक संमेलन ठरले राजकीय व्यासपीठ

शैक्षणिक संमेलन ठरले राजकीय व्यासपीठ 

प्रतिनिधी/ बेळगाव

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कर्नाटक सरकार सातत्याने भाषिकवाद निर्माण करत असते. अशातच मंगळवारी पार पडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या संमेलनात कन्नड भाषेचीच री ओढण्यात आली. तालुक्यात सर्वाधिक मराठी भाषिक शिक्षक असतानाही संपूर्ण संमेलन कन्नडमध्ये झाल्याने मराठी भाषिक शिक्षकांनी या संमेलनाकडे पाठ फिरविली. संमेलनात शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींपेक्षा राजकीय व्यक्ती निमंत्रित असल्याने हे संमेलन राजकीय संमेलन तर नाही ना, असा सवाल उपस्थितांतून व्यक्त होत होता.

कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने तालुक्यातील शैक्षणिक प्रगती  सुधारण्यासाठी तालुकास्तरीय संमेलनाचे आयोजन केले होते. हे संमेलन कुमार गंधर्व रंगमंदिर येथे पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे व उपाध्यक्ष अरुण कटांबळे उपस्थित होते.

शिक्षकांनी प्रथमत: स्वत:चा दर्जा वाढवावा

यावेळी बोलताना अरुण कटांबळे म्हणाले, आज सरकारी प्राथमिक शाळांची अवस्था पाहता शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. याला सर्वप्रथम जबाबदार आहेत ते शिक्षकवर्ग. कारण सरकार दरवर्षी लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च करत असते. परंतु सरकारी शाळांमधील पटसंख्या बोटावर मोजण्याइतकीच असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: स्वत:चा दर्जा वाढवावा, त्यानंतरच शिक्षणाचा दर्जा उंचावेल असे सांगून त्यांनी शिक्षकांचे चांगलेच कान टोचले. एकीकडे खासगी शिक्षण संस्था भरभराटीला येत आहेत तर दुसरीकडे सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आजचे विद्यार्थी हे डिजिटल झाले आहेत. परंतु आमचे शिक्षक अद्यापही मागेच राहिल्याने सरकारी शाळांची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे हा धोका वेळीच ओळखून सरकारी शाळांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचा सल्ला त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिला.

जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे म्हणाल्या, प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाच्या इमारतीचा पाया आहे. त्यामुळे हा पाया मजबूत असेल तरच चांगली इमारत उभी राहू शकेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बेंगळूर येथील शिक्षणतज्ञ निराजनाराध्य यांनी सध्याची शिक्षण पद्धती व शिक्षक याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बसवराज गुरीकार, ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील, व्ही. एम. मुळ्ळूर, जिल्हा शिक्षणाधिकारी एस. वाय. हळंगळी, डाएट प्राचार्य डी. एम. दानोजी, बेळगाव ग्रामीणचे शिक्षणाधिकारी आर. पी. जुट्टणवर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी इटगी येथील बालगायक विश्वप्रसाद गाणगी याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संमेलनात शिक्षकांना भेडसावणारे प्रश्न व शिक्षणात करावयाचा बदल या विषयी उहापोह करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गोणी व राजशेखर नेगीनहाळ यांनी केले. यावेळी तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.

Related posts: