|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडविरुद्ध मालिकाविजयासाठी विराटसेना सज्ज

इंग्लंडविरुद्ध मालिकाविजयासाठी विराटसेना सज्ज 

कटकमध्ये आज दुसरी वनडे, ‘चेस मास्टर’ विराटसमोर सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

वृत्तसंस्था/ कटक

कितीही मोठय़ा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची सवय उत्तमरित्या अंगी बाणवलेल्या भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध आज (दि. 19) दुसरी वनडे होत असून 3 सामन्यांच्या या मालिकेत विराटसेना मालिकाविजय संपादन करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. यापूर्वी पुणे येथील पहिल्या वनडेत भारताने विराट कोहली व केदार जाधव यांच्या धुवांधार शतकाच्या बळावर 351 धावांचे आव्हान लीलया पार करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यावर विजयी कळस चढवणे, हा त्यांचा आज प्राधान्यक्रम असेल.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अलीकडेच पूर्ण वेळ कर्णधारपद स्वीकारणारा विराट सध्या कारकिर्दीतील सर्वोच्च फॉर्ममध्ये असताना भारताला देखील प्रतिस्पर्ध्यांचा सफाया करण्यासाठी फारसे प्रयास करावे लागलेले नाहीत. त्यातही, विराटचा खेळ विशेषतः धावांचा पाठलाग करतानाच अधिक खुलत असल्याने ही देखील भारतीय संघासाठी अर्थातच जमेची बाजू झाली आहे. धावांचा पाठलाग करताना सध्या त्याच्या खात्यावर 17 शतके असून आणखी एका शतकासह त्याला सचिनचा विक्रम मोडण्याची नामी संधी असेल. धावांचा पाठलाग करताना सचिनच्या खात्यावरही 17 शतके नोंद आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये भारत तूर्तास 3 वेळा 350 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा एकमेव संघ ठरला असून या प्रत्येक वेळी विराटच त्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेमध्येही विराटने शतक झळकावलेच. शिवाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे केदार जाधवने देखील आपली आक्रमकता सिद्ध करुन दाखवली.

बाराबतीवर भारताचे उत्तम रेकॉर्ड

कटकमधील बाराबती स्टेडियमवर भारताने आजवर 15 वनडे खेळले असून त्यात 11 सामन्यात विजय संपादन केला आहे. इंग्लंडविरुद्ध यजमान संघाने येथे 4 सामने खेळले असून त्यात संघाची कामगिरी 2 विजय व 2 पराभव अशी समसमान आहे. यापूर्वी, पुणे येथील वनडे सामन्यात भारताने धमाकेदार विजय जरुर नोंदवला. त्यावेळी फक्त युवराज व धोनी या अनुभवी खेळाडूंना सूर सापडला नाही, इतकीच भारतासाठी चिंतेची बाब ठरली.

युवी देखील माईलस्टोननजीक

अजिंक्य रहाणेने दुसऱया सराव सामन्यात 83 चेंडूत 91 धावांची तुफानी खेळी साकारली, त्यामुळे दिल्लीचा डावखुरा फलंदाज शिखर धवन चिंतेत असताना रोहित शर्मा तंदुरुस्तीसह उपलब्ध असणे आणि ऋषभ पंतसारखा आक्रमक, तडफदार फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आगमनासाठी सज्ज असल्याने त्याला संघात स्थान मिळणार का, हे सामन्याच्या दिवशी सकाळीच स्पष्ट होऊ शकेल. 300 वनडे सामन्यांचा पल्ला गाठण्यासाठी आणखी 6 सामन्यांची आवश्यकता असलेल्या युवराजची कामगिरी देखील येथे महत्त्वाची ठरणार आहे.

आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन निष्प्रभ ठरला असला तरी कर्णधार विराट व प्रशिक्षक कुंबळेना तो कोणत्याही क्षणी मुसंडी मारु शकतो, याची खात्री वाटते. पुण्यातील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याने भारताच्या सर्वच गोलंदाजांना मार सोसावा लागला होता, हे देखील सर्वश्रुत आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या वनडे संघाला या मालिकेत विराटला रोखणे, हेच सर्वात मोठे आव्हान बनले आहे. इंग्लंडची फलंदाजी थोडीफार चांगली झाली असली तरी त्यांच्या गोलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली आहे. या दौऱयात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही त्यांना 0-4 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला आहे.

कोट्स

पहिल्या वनडेत विराटला स्ट्राईकपासून दूर ठेवणे, ही आमची रणनीती होती. पण, केदार जाधव इतका आक्रमक खेळेल, याची कल्पना केली नव्हती. पुढे विराटही आमच्या आवाक्याबाहेर गेला आणि तिथेच आमच्या हातून सामनाही निसटला होता.

-इंग्लिश कर्णधार इऑन मॉर्गन

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा.

इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसॉन रॉय, ऍलेक्स हॅलेस, जो रुट, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, अदिल रशिद, जेक बॉल, लियाम डॉसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.