|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आर्थिक चणचण, परिवहन कर्मचाऱयाचा मृत्यु

आर्थिक चणचण, परिवहन कर्मचाऱयाचा मृत्यु 

वार्ताहर/ सोलापूर

गेल्या पाच महिन्यापासून महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचारी वेतनाअभावी आर्थिक संकटात असताना याचा फटका बुधवारी एका कर्मचाऱयाच्या जीवावर बेतला. दहा दिवसांपुर्वी चक्कर येऊन पडल्यानंतर 11 व्या दिवशी त्याचा मृत्यु झाला. परिवहन युनियनने वेतनाचा निर्णय घेतल्याशिवाय मयत न करण्याचा विचार केला होता पण नातेवाईकांनी नकार देत मयत केली.

गेल्या तीस वर्षापासून परिवहन सेवेत कायम असलेले महमूदपीर बाबू मुल्ला वय 57 यांनी काल सकाळी सात वाजता शेवटचा श्वास घेतला. पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने परिवहन कर्मचाऱयांनी गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या दुसऱया दिवशी प्रशासनाकडून एक महिन्याचे वेतन देण्याचे मान्य केले असताना कर्मचाऱयांनी निर्णयास विरोध केला. संपूर्ण चार महिन्यांचे वेतन द्यावे अशी मागणी केली आहे.

7 जानेवारीला महमूदपीर बाबू मुल्ला यांना सात रस्ता परिवहन डेपोत भोवळ आली. त्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला आणि त्यांना वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सलग आठ दिवस दवाखान्यात ठेवल्यानंतर पैश्याअभावी 16 जानेवारीस शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. वळसंगकर दवाखान्यात 80 ते 90 हजारांचे बिल नातेवाईकांकडून उसनवारी करुन घेतले. जवळपास एक लाख दहा हजारांचे बिल उपचारासाठी आले.

मुल्ला यांच्या पाठीमागे आई,पत्नी, एक मुलगा, विवाहीत मुलगी असा परिवार आहे.

वेळ सरल्यावर प्रशासन जागे

दरम्यान त्यांना बी.पी. असल्याने गोळ्या चालू होत्या त्या घेण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते मात्र कामावर असताना त्यांना चक्कर आणि ते पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. उपचारादरम्यान पैश्यासाठी नातेवाईकांनी प्रशासनाकडे पगाराची मागणी केली पण नुसत्याच आश्वासनाभावी त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. निधनाची बातमी कळल्यानंतर व्यवस्थाप्रमुख म्याकलवार यांनी कर्मचाऱयांकरवी 10 हजार रुपये दिले. प्रत्यक्षात जिवंतपणी मदत करण्यास प्रशासन धजावले नाही. पण वेळ सरल्यानंतर मदत करण्यात कोणता शहाणपण असा सवाल उपस्थितांनी केला.

एकही बस रस्त्यावर नाही

वेतनाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केलं असताना प्रशासनाने प्रवाश्यांच्या सोयीसाठी आंदोलन मागे घ्यावे अन्यथा कारवाईचा इशारा दिला. बुधवारी या निर्णयाचा विचार करत कर्मचाऱयांनी कोणतीही भीक न घालता आंदोलन कायम ठेवले. सुमारे 80 बसेस तळ ठोकून होत्या.