जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत पाक सकारात्मक : भामरे
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नकळतपणे सीमा रेषा पार करुन पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारताकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत, याबाबत पाकिस्तानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले.
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर लगेचच चंदू चव्हाण हे नकळतपणे सीमा रेषा पार करुन पाकिस्तानात गेल्याचे वृत्त आले. तेव्हापासूनच भारतीय लष्कर जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी भारताकडून पाकिस्तानकडे बोलणीही झाल्याचे समजते. त्यानंतर आज स्वतः केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. मात्र, चंदू चव्हाण यांची सुटका नेमकी केव्हा होणार हे स्पष्ट करण्यात आले नाही.