|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वीजमंत्र्यांचे घनिष्ठ सहकारी शेखर खडपकर यांचे बंड

वीजमंत्र्यांचे घनिष्ठ सहकारी शेखर खडपकर यांचे बंड 

प्रतिनिधी/ वास्को

मुरगावचे आमदार तथा वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्याविरूद्ध भाजपातच प्रचंड असंतोष माजल्याचे दिसत आहे. मुरगावमधील भाजपचा एक एक बुरूज ढासळू लागला आहे. वीजमंत्र्यांचे घनिष्ठ सहकारी तथा वास्को रवींद्र भवनचे अध्यक्ष शेखर खडपकर यांनीही आता वीजमंत्र्यांविरूद्ध बंड ठोकले आहे. उद्या दि. 22 रोजी संध्याकाळपर्यंत ते आपल्या सुमारे सातशे सहकाऱयांसह एका खास कार्यक्रमात काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर यांना पाठिंबा जाहीर करणार आहेत.

भाजप आणि वीजमंत्री मिलिंद नाईक यांचे मागच्या दहा वर्षांपासून समर्थक असलेल्या तीन विद्यमान नगरसेवकांसह अनेक ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी गत पंधरा दिवसात वीजमंत्र्यांची साथ सोडली आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी न देता काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे मुरगावात भाजपचा विजयासाठी संघर्ष वाढलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आता गत दहा वर्षांपासून मिलिंद नाईक यांच्यामागे सावलीसारखे उभे राहिलेले समर्थक  खडपकर यांनीही बंड पुकारले आहे. खडपकर यांच्याकडे मुरगावसाठी पर्याय या नजरेतून पाहिले जात होते. ते प्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य आहेत. दोन वेळा मुरगावचे नगरसेवक होते. काही काळ नगराध्यक्षही होते. मात्र, गत पालिका निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागल्याने नाईक यांनी वास्कोतील रवींद्रभवनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन खडपकर यांची सोय केली होती. मात्र, या पुनर्वसनानेसुध्दा खडपकर यांचे समाधान झाले नव्हते, असे आता दिसून येत आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत खडपकर आपले सुमारे सातशे कार्यकर्ते व सहकाऱयांसमवेत वीजमंत्र्यापासून फारकत घेऊन एका कार्यक्रमात आमोणकर यांना पाठिंबा जाहीर करणार आहेत. भाजपात राहूनच काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याचा आणि त्यांच्या उमेदवारासाठी बळ उभे करण्याचा अजब प्रकार मुरगाव मतदारसंघात मागच्या पंधरा दिवसांपासून होऊ लागला आहे.

संकल्प आमोणकर यांच्या विजयात

महत्वाची भुमिका बजावणार

मुरगावात वीजमंत्री नाईक यांच्याविरूद्ध वारे वाहात आहे. परिणामी असंख्य कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावलेले असल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे. आपणही वीजमंत्र्यांच्या छुप्या कारस्थानांचा बळी ठरल्याचे खडपकर यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आपण फारकत घेतली असून भाजप मात्र सोडलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गत बारा वर्षांत नगरसेवक, नगराध्यक्ष, रवींद्रभवनचे अध्यक्ष, भाजप कार्यकर्ता अशा विविध माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले सुमारे सातशे लोक आपल्यासह संकल्प आमोणकर यांना पाठींबा देतील. यात पंचाहत्तर टक्के मतदार भाजपाचेच असतील असे त्यांनी सांगितले.

आपल्याविरूद्ध झालेल्या अन्यायाची माहिती देताना शेखर खडपकर यांनी आपण भाजपाचा कार्यकर्ता असतानाही काँग्रेस सरकारच्या काळात स्वबळावर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. मात्र, आपल्याच भाजपा सरकारच्या काळात सव्वा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आपण हरलो. उमेदवारी अर्ज भरायलाच पाचशे कार्यकर्ते आणणारा उमेदवार हरतोच कसा, हे आश्चर्य का घडले हे जनतेला माहित आहे. वीजमंत्र्यांनी आपल्या विजयासाठी कसलेच प्रयत्न केले नाहीत. पालिका निवडणुकीत आपल्याविरूद्ध उभा राहिलेला उमेदवार आणि आपल्याविरूध्द कार्य करणारे काही कार्यकर्ते आज वीजमंत्र्यांच्या खास मर्जीतले बनले आहेत. त्यांना बक्षीसी मिळालेली आहे. एमपीटीचे विश्वस्तपद देऊनही आपल्याविरूद्ध स्थानिक जनतेत गैरसमज पसरविण्यात आले. मुरगावात आपल्याला लोक भाजपाचे नेते मानतात. परंतु सध्याच्या निवडणुक प्रचार नियोजनापासूनही आपल्याला दूर ठेवून अप्रत्यक्षरीत्या आपल्यावर अविश्वास व्यक्त करण्यात आला. अन्याय, अविश्वास आणि छुप्या कारवाया अशा प्रकारामुळे आपल्याला वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्याबरोबर राहणे योग्य वाटत नाही असे स्पष्ट करून शेखर खडपकर यांनी रवींद्रभवनचे अध्यक्षपद आपल्याला सरकारने दिलेले असल्याने तसेच आपण भाजपा सोडलेली नसल्याने आपण या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले.

Related posts: