|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक

सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक 

मलेशियन मास्टर्स ग्रां प्रि स्पर्धा : आज जेतेपदासाठी थायलंडच्या पोर्नपेव चोकोवांगचे आव्हान

वृत्तसंस्था / सारवाक (मलेशिया)

भारताची स्टार खेळाडू व लंडन ऑलिम्पिक कांस्यजेत्या सायना नेहवालने धडाकेबाज विजयासह मलेशियन मास्टर्स ग्रां प्रि स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सायनाने हाँगकाँगच्या यिप यिनचा पराभव केला.

शनिवारी झालेल्या 120,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील उपांत्य लढतीत सायनाने धमाकेदार विजय मिळवला. सायनाने हाँगकाँगच्या पाचव्या मानांकित यिप यिनला 21-13, 21-10 असे पराभूत केले. विशेष म्हणजे, सायनाने पुनरागमनानंतर प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रिओ ऑलिम्पिकनंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने सायना बॅडमिंटन कोर्टपासून दोन महिने दूर होती. यानंतर चायना मास्टर्स, इंडोनेशियन ओपन स्पर्धेत तिला दुसऱया फेरीतच गारद व्हावे लागले होते. मात्र, शनिवारी सायनाने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत मलेशियन मास्टर्सच्या अंतिम फेरीत धडक मारत जागतिक पातळीवरील आपला सरस दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. जेतेपदासाठी रविवारी सायनासमोर थायलंडच्या पोर्नपेव चोकोवांगचे आव्हान असेल. 26 वर्षीय सायनाने यिनविरुद्ध आपली विजयी पंरपरा कायम ठेवली. पहिल्या गेममध्ये सायनाने 7-4 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवताना सानियाने पहिला गेम 21-13 असा जिंकला. दुसऱया गेममध्ये सायनाने यिनला जराही संधी दिली नाही. सायनाने हा गेम 21-10 असा जिंकत अंतिम फेरीतील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सायनाने इंडोनेशियाच्या फित्रियानीला 21-15, 21-14 असे नमवत उपांत्य फेरी गाठली होती. पुरुष गटात अजय जयरामला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दुसऱया उपांत्य लढतीत थायलंडच्या बिगरमानांकित पोर्नपेव चोकोवांगन संघर्षमय लढतीत चीनच्या दुसऱया मानांकित चेऊंग यिला 21-19, 20-22, 21-18 असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. 76 मिनिटे चाललेल्या या लढतीत पोर्नपेवने बाजी मारताना अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

Related posts: