|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » टेंभुच्या पाण्याची तातडीने मागणी नोंदवा

टेंभुच्या पाण्याची तातडीने मागणी नोंदवा 

प्रतिनिधी/ आटपाडी

टेंभु योजनेचे पाणी सध्या सुरू झाले आहे. हे पाणी आटपाडी तालुक्यात येण्यासाठी सर्व शेतकऱयांनी पाण्याची मागणी नोंदविली पाहिजे. पाणीपट्टी भरण्याची  तयारी करून पाणी मागणी नोंदविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. शेतकऱयांची मागणी आणि पाणीपट्टी जमा झाल्यानंतर टेंभुच्या अधिक्षक अभियंत्यांशी पाणी सोडण्याबाबत तात्काळ बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व आनंदराव पाटील यांनी दिली.

आटपाडी तालुक्यात टेंभुचे पाणी सुरू करण्याच्या मागणीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील बोलत होते. श्रमिक मुक्ती दल आणि पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी डॉ.भारत पाटणकर यांच्या यांच्या नेतृत्त्वाखाली सातत्याने लढा उभारण्यात आला आहे. सध्या टेंभुचे आवर्तन सुरू झाले असून आटपाडी तालुक्यात हे पाणी आणण्यासाठी अधिकृत मागणी नोंदविण्याची गरज आहे.

सध्या येवु शकत असलेल्या तलाव आणि भागामध्ये टेंभुचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱयांनी पाण्याची मागणी नोंदविली पाहिजे. शिवाय पाणीपट्टी भरून ही योजना चालविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहनही राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील यांनी केले. वीजबील वजा करून पाणीपट्टी वसुल करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्याबाबत मंत्रीमंडळाने तातडीने निर्णय घेवुन दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला पाहिजे.

आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी 27जानेपर्यंत टेंभुच्या पाण्याची लेखी मागणी नोंदवावी. त्यानंतर ही मागणी व पाणीपट्टी या अनुषंगाने टेंभुच्या अधिकाऱयांशी बैठक करून शेतकऱयांच्या बांधापर्यंत पाणी जाण्याची तजवीज होईल. शेतकऱयांनी ताकदीने पाणी मागणी नोंदविली पाहिजे. त्यामुळे टेंभुचे आवर्तने नियमीत होवुन जास्तीत जास्त शेतीला लाभ होईल. जादा क्षेत्र भिजल्यास पाणीपट्टीचीही भार कमी होणार आहे. शिवाय वीजेचा प्रश्नही गंभीर असून उपलब्ध पाण्याचा लाभ पिकांना होणार असल्याचे राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले.

आटपाडी तालुक्यात सध्याच्या नियोजनानुसार सुमारे एक टीएमसी पाणी टेंभुचे येवु शकते. हे पाणी मिळण्यासाठी मागणी नसेल तर समस्या निर्माण होणार आहे. पुन्हा आपल्याला पाणी मिळाले नाही, असे होवु नये. त्यासाठी शेतकऱयांनी दक्ष व्हावे असे आवाहनही राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील यांनी केले.