|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सिंधु-गोवालाही देणे प्रवाशांची लाडकी ‘कोकणकन्या’ झाली 20 वर्षांची!

सिंधु-गोवालाही देणे प्रवाशांची लाडकी ‘कोकणकन्या’ झाली 20 वर्षांची! 

कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक डब्यांची गाडी,

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रेल्वे प्रवाशांच्या गळय़ातील ताईत बनलेली कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ने प्रवासी सेवेची 20 वर्ष पूर्ण करत शुक्रवारी 21 व्या वर्षात पदार्पण केल आहे. सुमारे सव्वा कोटीहून अधिक प्रवाशांना वाहून नेणाऱया या रेल्वे गाडीला देशभरातील पहिल्या पाच प्रवासी प्रिय गाडय़ांमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबईहून गोव्यापर्यंत जाणाऱया या गाडीला नेहमीच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून ही गाडी नवनवे उच्चांक गाठत आहे.

20 वर्षापूर्वी बरोबर 20 जानेवारीला कुर्ला-सावंतवाडी या मार्गावर ही गाडी सर्वप्रथम धावली. तब्बल 22 तासांच्या प्रवासानंतर ही गाडी सावंतवाडी स्थानकात पोहचली. त्यानंतर ती छत्रपती शिवाजी टर्मिनल्सहून सावंतवाडीपर्यंत धावू लागली. यानंतर तिच्या मार्गात बदल करण्यात आला. छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवरुन ती गाडी 26 जानेवारी 1998 ला मडगावपर्यंत धावू लागली. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब गाडी म्हणून तिला मान देण्यात येतो. सुरुवातीच्या टप्प्यात या गाडीला 18 डबे होते. त्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या या गाडीला 24 डबे जोडले गेले आहेत.

भुताटकीची गाडी

या गाडीला प्रवासी लोक गंमतीने ‘भुताटकी’ची गाडी असे म्हणतात. वर्षात केव्हाही पाहिले असता ही गाडी प्रवाशांनी परिपूर्ण भरलेली असते. वर्षाच्या 365 दिवस ही गाडी प्रवाशांनी भरलेली असल्याने तिला हे नाव गमतीने दिले जाते.  या गाडीला एक्सप्रेस गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. प्रत्यक्षात ती सेमी पॅसेंजर असल्याचा अनुभव प्रवासी घेत आहेत. या गाडीला रत्नागिरी जिह्यात निवसर आणि सिंधुदुर्ग जिह्यात नांदगाव वगळता जवळपास सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

फुडकोर्ट ऑफ इंडिया

‘कोकणकन्या’ला असलेले भोजन यान देशभरातील रेल्वे गाडय़ांमध्ये लक्षणीय आहे. या भोजन यानाला फुडकोर्ट ऑफ इंडिया असे म्हटले जाते. या गाडीत जवळपास 86 प्रकारचे खाद्यप्रकार मिळतात. त्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. इतके खाद्यप्रकार अन्य रेल्वे गाडय़ांमध्ये उपलब्ध नाहीत.

‘कोकण कन्या’साठी सुरुवातीला दोन रेक उपलब्ध होते. त्यानंतर चार रेक उपलब्ध करुन देण्यात आले. एक रेल्वे गाडी म्हणजे एक रेक होय. कोकण कन्याच्या उपलब्धतेसाठी अशा चार गाडय़ा एकाच वेळी उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. सध्या तीन गाडय़ांच्या उपलब्धतेवर कोकणकन्या धावत आहे. चार वरुन तीन गाडय़ा ठेवण्यात आल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक बेभरोसे झाले आहे.

प्रवाशांच्या सुचनेवरून नामकरण

कोकणकन्या गाडी सुरु झाली तेव्हा ऑनलाईन पध्दतीने सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झुआरी नावावरुन काही नाव या गाडीला द्यावे अशा सूचना होत्या. कोकणकन्या हे नाव द्यावे अशा सूचना सर्वाधिक झाल्याने या गाडीला कोकणकन्या हे नाव देण्यात आले. परतीच्या प्रवासात ही गाडी मांडवी एक्सप्रेस म्हणून प्रवास करते. कोकणातील लोकांच्या सूचनेप्रमाणे एका फेरीला कोकणकन्या हे नाव तर परतीच्या फेरीला मांडवी हे नाव गोव्यातील प्रवाशांच्या सूचनेप्रमाणे देत समतोल साधण्याचा प्रयत्न रेल्वे बोर्डाने केला आहे.

स्वच्छता चांगली, देखभालही चांगली

बोडस यांचा फोटो वापरणे

रत्नागिरीतील रेल्वेप्रेमी प्रा. उदय बोडस म्हणाले, ही गाडी स्वच्छ ठेवण्याचा रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत असते. गाडीची देखभाल नियमितपणे ठेवण्याचाही उत्तम प्रयत्न असतो. रेल्वे क्रॉसिंगमुळे गाडी काही वेळा विलंबनाने पोहोचते.  हा  अपवाद वगळता ‘कोकणकन्या’ सेवा समाधानकारक असून त्यामुळे आज 20 वर्षांनंतरही ही गाडी कोकणवासीयांना आपली हक्काची वाटते. त्यामुळेच या गाडीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.