|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच

शहरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच 

प्रतिनिधी/ बेळगाव

सराफ कॉलनी, टिळकवाडी येथील एका बंद घराच्या पाठीमागचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी 5 लाख 61 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून वाढत्या चोऱया व घरफोडय़ांच्या सत्रामुळे नागरिक हैराण झाले आहेत.Add New

सराफ कॉलनी, टिळकवाडी येथील शिक्षिका शकुंतला नाईक यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी आपल्या घराला कुलुप लावून कामानिमित्त अंकोल्याला गेल्या होत्या. शकुंतला यांच्या बहिणीचा मुलगा गदगला पोलीस अधिकारी आहे. शुक्रवारी गृहमंत्र्यांच्या बेळगाव दौऱयाच्या पार्श्वभूमीवर ते बेळगावला आले होते.

पोलीस अधिकारी असलेले बहिणीचे मुलगे मावशीला भेटण्यासाठी म्हणून सायंकाळी पाच वाजता सराफ कॉलनी येथील शकुंतला यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शकुंतला यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. त्या अंकोल्याहून परतल्यानंतर टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले.

शकुंतला यांच्या बंद घराच्या पाठीमागचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. तिजोरीतील 206 गॅम सोन्याचे दागिने, चांदीची एक मूर्ती व तांब्याच्या दोन घागरी असा 5 लाख 61 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी. ए. जाधव व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वीच गुड्सशेड रोड परिसरात बंद घराचा पाठीमागचा दरवाजा फोडून 50 हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच सराफ कॉलनी, टिळकवाडी येथे घरफोडीचा प्रकार घडला आहे. वाढत्या चोऱया व घरफोडय़ांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.