|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सपा-काँग्रेसचा 298:105 फॉर्म्युला

सपा-काँग्रेसचा 298:105 फॉर्म्युला 

आघाडीची घोषणा : जातीय शक्तींना मूठमाती देण्याचा एल्गार : दीडशे जागा मागणाऱया काँग्रेसची केवळ 105 जागांवर बोळवण

लखनौ / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. विधानसभेच्या 403 जागांपैकी 105 जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली असून उर्वरित 298 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम आणि उत्तर प्रदेशमधील काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज बब्बर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर केले आहे. जातीय शक्तींना मूठमाती देण्याचा प्रयत्न आघाडी करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या आघाडीमध्ये तिसऱया कोणत्याही पक्षाला समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. आघाडीबाबत बोलताना नरेश उत्तम यांनी ही युती राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असे स्पष्ट केले. समाजवादी पक्ष देशातील एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असेल. त्याचबरोबर राज्याचा विकास साधण्यासाठी सपा-काँग्रेस आघाडी सदैव कार्यरत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सपा-काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रकाशित केला जाणार असून त्यात दोन्ही पक्षांची भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली जाईल, असे नरेश उत्तम यांनी जाहीर करत आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन राज्यवासियांना केले. राज बब्बर यांनी केंद्रातील भाजप सरकारवर यावेळी सडकून टीका केली. भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे आखत असून सपा-काँग्रेस आघाडी बळीराजाच्या हितासाठी लढणार आणि न्याय मिळवून देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी स्पष्ट केले.

राज्यात सपा-काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये बऱयाच चर्चेच्या फेऱया झाल्या होत्या. आघाडी करणे निश्चित झाले असले तरी जागांचा तिढा कायम होता. अखेर रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना दिलेल्या निर्देशानुसार 298:105 अशा जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अखिलेश यादव, प्रियांका गांधी, राज बब्बर आदींनी चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी सांगितले.

सर्वप्रथम समाजवादी पक्ष काँग्रेसला शंभरहून अधिक जागा सोडण्यास तयार नव्हता. काँग्रेसकडून मात्र दीडशेहून अधिक जागांचा आग्रह कायम होता. त्यामुळे जागावाटपाचे सूत्र ठरण्यास विलंब झाला. अखेरीस काँग्रेसला 105 जागा सोडण्याची तयारी समाजवादी पक्षाने दर्शवली.

Related posts: