|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विजय सरदेसाईकडून मतदारांची दिशाभूल

विजय सरदेसाईकडून मतदारांची दिशाभूल 

प्रतिनिधी/ मडगाव

फातोर्डा मतदारसंघातील मतदारांची विजय सरदेसाई हे गेल्या पाच वर्षापासून दिशाभूल करीत आले आहे. त्यात कुठेच खंड पडलेला नाही. या निवडणुकीत देखील तिच परंपरा कायम ठेवली आहे. आपल्या नावाशी साम्य असलेल्या व्यक्तीला त्यांनी अर्ज भरण्यास सांगितला व नंतर तो अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. जेणेकरून मतदारांना वाटावे की, आपण निवडणुकीतून माघार घेतली. असा आरोप काँग्रेस पक्षाचे उमेदवार जोसेफ सिल्वा यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

आपण निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. काँग्रेस पक्षाचा आपण अधिकृत उमेदवार असून या वेळी फातोर्डा मतदारसंघातील मतदार बदल घडवून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्याला वैयक्तीक कोणावरच टीका करायची नाही. मात्र, वारंवार मतदारांची दिशाभूल करणाऱयांना उघडे पाडलेच पाहिजे असे मत देखील, श्री. सिल्वा यांनी मांडले.

यावेळी पियेदाद नोरोन्हा म्हणाल्या की, फातोडर्य़ातील मतदारांना धमकावण्याचे सत्र सुरू झाले आहे. हा प्रकार मतदार आत्ता खपवून घेणार नाही. त्याचबरोबर विजय सरदेसाई यांच्या आमिषाला देखील बळी पडणार नाही.

काल जोसेफ सिल्वा यांनी माडेल भागात घरोनघरी प्रचार केला. आपल्याजवळ वेळ कमी असला तरी प्रचार योग्य पद्धतीने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांकडून आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रचाराच्या दरम्यान, त्यांनी विजय सरदेसाईच्या विरोधातील आरोपपत्र मतदारांना वितरीत केले.

यावेळी फातोर्डा मतदारसंघासाठी स्वतंत्र असा जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात फातोडर्य़ातील जनतेसाठी 100 टक्के रोजगार संधी, रस्त्याचा बाजूला वृक्ष लागवड, नाले व गटाराची स्वच्छता, फुटपाथ व सायकलिंग लेन, सूसज्ज अशी पार्किग व्यवस्था, अत्याधुनिक कदंब बस स्थानक उभारणे, फलोत्पादनसाठी स्टोरेज व्यवस्था, एसजीपीडीए मार्केटसाठी सोलर पावर कोल्ड स्टोरेज, वैज्ञानिकदृष्टय़ा शेतीची लागवड, साळ नदी स्वच्छ करणे, कचऱयाचे योग्य व्यवस्थापन, फातोर्डा मतदारसंघातील प्रत्येक शाळेत व हायस्कूलात डिजिटल क्लासरूम व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग व नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सुविधांचे सर्वधन करणे इत्यादीवर भर देण्यात आला आहे.

Related posts: