|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सर्वोच्च न्यायालयात आज सीमाप्रश्नी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज सीमाप्रश्नी सुनावणी 

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सोमवार दि. 23 रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्यावेळी साक्षी व पुरावे नोंदविण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून सुनावणीकडे संपूर्ण सीमावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आला असून साक्षी पुरावे नोंदविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश मनमोहन सरीन यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्राच्यावतीने साक्षी पुरावे नोंदविण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. न्यायालयात सादर करण्यात येणारी प्रतिज्ञापत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती मिळाली असून सोमवारी होणाऱया सुनावणीच्यावेळी महाराष्ट्राने दाखल केलेल्या दोन अंतरिम अर्जांवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयात दोन अंतरीम अर्ज दाखल केले आहेत. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सीमाभागात जैसे थे परिस्थिती ठेवावी. कर्नाटक सरकारने कोणताही हस्तक्षेप करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

11 जुलै रोजी सुनावणी होणार होती मात्र त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश उपस्थित न राहिल्याने सुनावणी लांबणीवर पडली होती. मात्र आता सुनावणी होणार असल्याने न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महाराष्ट्राच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह ऍड. शिवाजीराव जाधव, अपराजिता सिंग आदी सीमाप्रश्नी काम पाहत आहेत. तर कर्नाटक सरकारच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना बेळगावातील ज्येष्ठ वकील ऍड. राम आपटे हे मदत करीत आहेत. सकाळी 11.30 वा. न्यायालयात सुनावणीस सुरूवात होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related posts: