|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय

प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय 

पाटण शाखा उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे प्रतिपादन, लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापुरात शाखा सुरू करणार

प्रतिनिधी /पाटण

सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या बळावर काळाची पावले आणि आव्हाने ओळखून वाटचाल करणाऱया चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने बचतीचा संस्कार, पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकीच्या अनेक वैशिष्टय़पूर्ण परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक प्रगती केली. सहकार चळवळ आज संक्रमण अवस्थेतून जात आहे. सहकार क्षेत्राला अनेक खडतर आव्हांनाना सामोरे जावे लागत असून ही चळवळ कोलमडली तर समाज सावकारीच्या विळख्यात जाईल. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येक कुटुंब पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले.

चिपळून नागरी सहकारी पतसंस्थेच्या येथील 30व्या शाखेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सहकार चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र समृद्ध झाला. कोकणसारख्या प्रतिकूल परिस्थितीत सहकारातून आर्थिक सुबत्ता गोरगरिबांच्या जीवनात निर्माण करण्याचे खडतर आव्हानांना सामोरे जाताना गोरगरीब, दुर्बल, वंचित लोकापर्यंत जाऊन संस्था प्रगतीकडे झेपावत आहे. सहकार क्षेत्रातील वातावरण गढूळ बनत आहे. प्रामाणिकपणे पारदर्शक कारभार करणाऱया संस्थांना खडतर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. केवळ ठेवी गोळा करण्यापेक्षा कष्ट करणाऱयाला विनात्रास सहज, सुलभ व जलद कर्ज पुरवठा करून संसार उभे करण्यास प्राधान्य देताना ग्राहकांना बचतीचा संस्कार देणाऱया पतसंस्थेने सामाजिक जाणिवेतून भविष्यातील स्वप्ने साकार करणाऱया योजना यशस्वी केल्या आहेत.

यापुढील काळात पतसंस्थेच्या माध्यमातून 25 हजार बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारातून स्वावलंबी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने निर्देश देण्यापूर्वीच पतसंस्थेने 2007मध्ये खेडय़ापाडय़ात अधिकृत समन्वयक नेमणारी चिपळूण नागरी एकमेव पतसंस्था आहे. पाटण शाखेच्या माध्यमातून 25-30 हजार कुटुंबे संस्थेशी जोडली जातील. पतसंस्था समाजाच्या तळागाळातील माणसासाठी आहे. संस्थेचे 85 हजार सभासद हेच आमचे प्रचारक आहेत. आर्थिकदृष्टय़ा संपन्न, स्वावलंबी व सक्षम असणारी एकमेव पतसंस्था असल्याचे सांगितले.

पुणे जिल्हा उपनिबंधक प्रदीप बर्गे म्हणाले, सहकार क्षेत्रातील दिग्गज माणसांच्या विचारामुळे पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली. राज्यात 15 हजार पतसंस्था असून कोकणामध्ये संस्था कमी आहेत, पण आहेत त्या गुणवत्तापूर्ण आहेत. पतसंस्थासाठी सध्या कठीण काळ असून गुणवत्ता सिद्ध करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

यावेळी अविनाश आमरे, जयवंतराव शेलार, जाधव सर, प्रदीप घाडगे, ऍड. विजय पाटील, आप्पासाहेब पडवळ, विक्रमसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या शुभसंदेशाचे वाचन व सूत्रसंचलन अशोकराव साबळे, स्वागत सुभाषराव चव्हाण, तर आभार प्रदर्शन अशोक कदम यांनी केले.

याप्रसंगी कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपान चव्हाण, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, जिल्हा उपनिबंधक प्रदीप बर्गे, विजय पवार, जयवंत शेलार, अरविंद आमरे, सौ. स्मिता चव्हाण, बी. वाय. यादव, के. आर. शिंदे, डॉ. पी. एच. चव्हाण, सतिश रणदिवे, राजेंद्र राऊत, दत्ता गोसावी, राघवेंद्र पाटील, अरविंद फुटाणे, किशोर तुळसणकर, फत्तेसिंह पाटणकर, सुभाष शिर्के, करण जाधव, तुकाराम जाधव, सौ. आयेशा सय्यद, मुबारक सरकवास, गणी चाफेकर, लक्ष्मण पवार, प्रशांत यादव, सरव्यवस्थापिका सौ. स्वप्ना यादव, व्यवस्थापक अरविंद गुढेकर, नितीन खताते आदी उपस्थित होते.

लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापूर शाखा

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच नेत्रदीपक प्रगती केली. 85 हजार सभासद संख्या असून 3 लाख 89 हजार कुटुंबापैकी 2 लाख 37 हजार कुटुंबे पतसंस्थेशी जोडली गेली आहेत. शंभर टक्के वसुली आणि शून्य टक्के एन. पी. ए. असणाऱया पतसंस्थेच्या मल्हारपेठ, मुंढे (कराड), कोल्हापूर येथील शाखा लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी यावेळी केली.