|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय

आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय 

संस्था पॅनेलने आपले बळ वाढवले, सर्व गटात प्रवेश, अध्यक्षपदी राज्यमंत्री श्रीपाद नाईक

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकणपट्टीतील अग्रगण्य असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात विद्यमान सत्ताधारी अरुअप्पा पॅनेलने दणदणीत बहुमत मिळवून सत्ता संपादन केली. तर विरोधी संस्था पॅनेलने आपली परिस्थिती अधिक बळकट करुन नव्या कार्यकारिणीत प्रवेश केला आहे. नियामक मंडळाच्या 18 जागांपैकी अरुअप्पा पॅनेलने 14 जागांवर विजय संपादित केला तर संस्था पॅनेलने 4 जागांवर विजय मिळवला.

अरुअप्पा विरुध्द संस्था पॅनेल

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेल आणि संस्था पॅनेल अशी दोन पॅनेल एकमेकांच्या विरोधात उभी होती. विद्यमान सत्ताधाऱयांचे अरुअप्पा पॅनेल असून माजी सत्ताधारी मंडळींचे संस्था पॅनेल म्हणून निवडणूक लढवली गेली. श्रीमती शिल्पा पटवर्धन या अरुअप्पा पॅनेलचे नेतृत्व करत असून रमेश कीर आणि श्रीकांत वैद्य यांनी संस्था पॅनेलचे नेतृत्व केले.

अध्यक्षपदी श्रीपाद नाईक

रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सकाळी 7.30 वा. पासून मतमोजणीचा सुरुवात झाली. निर्वाचन अधिकारी म्हणून डॉ. मकरंद रघुनाथ साखळकर यांनी काम पाहिले. संध्याकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदी श्रीपाद येसो नाईक हे विजयी झाले. त्यांनी ऍड. सुधाकर भावे यांचा पराभव केला. नाईक हे पेंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. मुकुंद मनोहर जोशी, ऍड. अशोक शंकर कदम विजयी झाले. हे दोघे अरुअप्पा पॅनेलचे सदस्य आहेत. भिकाजी वामन ऊर्फ बबनराव पटवर्धन या संस्था पॅनेलच्या उमेदवारांनी बाळासाहेब माने या अरुअप्पा पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव केला. याशिवाय सुधीर वणजू व मनोहर भिडे हे संस्था पॅनेलचे दोन उमेदवार पराभूत झाले.

विश्वस्त पदाच्या निवडणुकीत डॉ. रघुवीर पांडुरंग भिडे आणि रवींद्र प्रभाकर ऊर्फ मुन्ना सुर्वे हे अरुअप्पा पॅनेलचे उमेदवार निवडून आले. त्यांनी श्रीधर विनायक शेंडय़े व रमेश पांडुरंग सावंत यांचा पराभव केला. याशिवाय संस्था पॅनेलच्या सौ. मोहिनी हेरंब पटवर्धन विजयी झाल्या. त्यांनी लीलाधर उर्फ राजन जोशी (अरुअप्पा पॅनेल) यांचा पराभव केला.

सल्लागार मंडळात संस्था पॅनेलचा प्रवेश

सल्लागार मंडळामध्ये अरुअप्पा पॅनेलचे जयंत करमरकर, सदाशिव लेले, विश्वनाथ बापट, श्रीमती अनघा चितळे, सुदेश प्रसादे, प्रकाश जोशी, भारत फडके, मनोहर पोंक्षे निवडून आले. संस्था पॅनेलचे डॉ. श्रीराम केळकर व विद्याधर दाते हे सल्लागार मंडळात निवडून आले. अरुअप्पा पॅनेलचे महेश काटदरे व प्रा. दत्तात्रय अनंत ऊर्फ नाना शिंदे हे पराभूत झाले. संस्था पॅनेलचे सौ. सुप्रिया बेंदरकर, प्रदीप तेंडुलकर, युनुस पडवेकर, सौ. वृषाली नार्वेकर, दिलीप मुरारी उर्फ नाना मयेकर, प्रदीप मधुकर चोडणकर, श्रीकांत फगरे, दीपक दत्तात्रय कुलकर्णी हे पराभूत झाले.

नियामक मंडळात अरुअप्पा पॅनेलचे बहुमत

नियामक मंडळामध्ये श्रीमती शिल्पा पटवर्धन, श्रीमती प्राची जोशी, उल्हास लांजेकर, हेमंत उर्फ विजय देसाई, डॉ. सौ. कल्पना मेहता, डॉ. चंद्रशेखर केळकर, सौ. प्रज्ञा भिडे, राजेंद्र मलुष्टे, सुहास पटवर्धन, मंदार गाडगीळ, मनोज पाटणकर, ऍड. विजय साखळकर, आनंद देसाई, उमेश लोवलेकर हे अरुअप्पा पॅनेलचे 14 उमेदवार निवडून आले. नियामक मंडळात संस्था पॅनेलचे उदय लोध, श्रीकांत वैद्य, संजय पटवर्धन, रमेश कीर हे चौघे सदस्य निवडून आले. नियामक मंडळाच्या 18 सदस्यांपैकी श्रीमती शिल्पा पटवर्धन यांना सर्वाधिक मते पडली. सर्वात कमी मते रमेश कीर यांना यांना पडली. गेल्यावेळी रमेश कीर यांना नियामक मंडळाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. यावेळी त्यांनी विजय मिळवून नियामक मंडळात प्रवेश केला आहे

अनेकजण पराभूत

नियामक मंडळासाठी संस्था पॅनेलकडून उभे असलेले खालीद अब्दुल्ला काझी, हरिश्चंद्र गणपत गीते, भिमसेन रघुनाथ रेघे, सुभाष श्रीराम बाष्टे, सुधाकर विठोबा सुर्वे, विवेक जगन्नाथ भावे, डॉ. अजिज मुबारक पठाण, चंद्रकांत उध्दव हळबे, तुकाराम सोनू घवाळे, अभिजित अशोक केळकर, माधव मोहन देवस्थळी, प्रकाश वामन घळसासी, मंदार सरपोतदार हे उमेदवार पराभूत झाले. अरुअप्पा पॅनेलकडून नियामक मंडळासाठी उभे असलेले ऍड. विलास पाटणे, भरत ओसवाल, सचिन लांजेकर हे पराभूत झाले.

कार्यवाह पदासाठी चुरस

कार्यवाह पदासाठी निवडणूक मोठय़ा चुरशीची झाली. त्यामध्ये सतीश मधुसुदन शेवडे यांनी बाजी मारली. माधव पालकर यांच्याविरोधात पाच मतांच्या फरकाने ते विजयी झाले. पालकर हे संस्था पॅनेलचे तर शेवडे हे अरुअप्पा पॅनेलकडून निवडणूक लढवत होते. सहकार्यवाह पदासाठी संस्था पॅनेलच्या नथुराम तानाजी देवळेकर यांनी 9 मतांनी विजय मिळवला. राजेश आयरे हे अरुअप्पा पॅनेलचे या पदासाठी उमेदवार होते.

अरुअप्पा पॅनेलचे निर्विवाद यश

यावेळेला संस्था पॅनेलचे बळ वाढले असले तरी अरुअप्पा पॅनेलची सत्ता कायम राहणार आहे. नियामक मंडळाच्या 18 सदस्यांपैकी 14 सदस्य अरुअप्पा पॅनेलचे असल्याने निर्विवादपणे या पॅनेलला आपला कारभार करता येणार आहे. प्रत्येक गटात निर्णायक बहुमत अरुअप्पा पॅनेलकडे आहे. यापूर्वी बहुमताच्या आधारावर जसा कारभार अरुअप्पा पॅनेल करत होते तसाच यापुढेही कारभार करणे शक्य होणार आहे.

संस्था पॅनेलचे प्रतिनिधीत्व

उपाध्यक्ष, विश्वस्त, सल्लागार, नियामक मंडळ, कार्यवाह-सहकार्यवाह अशा सर्व गटात कीर यांच्या नेतृत्वाखाली संस्था पॅनेलने आपले उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले. यापूर्वी संस्था पॅनेलचे एक उपाध्यक्ष व एक नियामक मंडळ सदस्य असे बळ होते. आता त्या बळात भर पडली. उपाध्यक्ष एक, विश्वस्त एक, सल्लागार दोन, नियामक मंडळ सदस्य 4, सहकार्यवाह एक याप्रमाणे संस्था पॅनेलचे उमेदवार निवडून आले.