|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी 

अडीच वर्षापुर्वी आंबव इंजिनिअरिंग कॉलेजसमोर घडली होती घटना

देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा,

दोघांनाही 10 वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी /रत्नागिरी

संगमेश्वर तालुक्यातील आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या पोटात धारधार चाकूने वार केल्याची घटना सुमारे अडीच वर्षापुर्वी घडली होती. याप्रकरणी नुकतीच येथील न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन सातारा येथील दोन्ही आरोपींना प्रत्येकी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

रोहित रामचंद्र भोईटे (25, हुमगाव, जावळी, सातारा), शेखर बाबासाहेब शिंदे (28, इंदवली, करंडी, ता. जावळी, सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील विनय गांधी यांनी काम पाहिले.

देवरूख पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 ऑगस्ट 2014 रोजी दुपारी 1.45 च्या सुमारास आंबव इंजिनिअरिंग कॉलेजसमोर ही घटना घडली. रोहित भोईटे याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो तिला मोबाईलद्वारे अश्लिल एसएमएस व संभाषण करत असे. मात्र, तिने त्याला प्रतिसाद न दिल्याने रोहित चिडला. त्याने शेखरशी संगनमत करून या मुलीच्या हालचालीवर लक्ष ठेवले. ही मुलगी कॉलेज कॅम्पस्मध्ये पायवाटेने जात असताना रोहितने धारधार चाकूने तिच्या पोटात वार करून जखमी करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेखरच्या मोटारसायकलवर बसून पळून गेले.

याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी 5 नोव्हेंबर 2014 रोजी दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने 13 साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. व्ही ए दिक्षीत यांच्या कोर्टात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून संपूर्ण गूणदोषांची पडताळणी करून दोन्ही आरोपींना भादवि 307 प्रमाणे दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने कैद अशी शिक्षा सुनावली.