|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच?

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच? 

शहर वगळून चिपळूण तालुक्याला 268 कोटी प्राप्त,

आणखी 77 कोटीची गरज,

मोबदला वाटपाला आचारसंहितेचा फटका

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागामालकांना मोबदल्यापोटी 381 कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर आता शहर वगळून चिपळूण तालुक्यातील तेरा गावांसाठी 268 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र अजूनही 77 कोटीची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शिक्षक तसेच पदविधर मतदार संघ निवडणूक आचारसंहितेचा फटका मोबदला वाटपाला बसणार आहे. त्यामुळे मोबदला वितरणाची प्रकीया पूर्ण होऊन चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला पावसाळय़ानंतरच प्रारंभ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महामार्गाच्या चौपदरीकरणाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी केंद्र शासनाने रत्नागिरीसाठी 203 कोटी रुपये, तर संगमेश्वरसाठी 178 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. चौपदरीकरणासाठी रत्नागिरी, संगमेश्वरमधील 34 गावांमधील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तेथील जमिनीचा निवाडा जाहीर करण्यात आला असल्याने तेथील जागा मालकांना त्याचे वाटप लवकरच केले जाणार आहे. आता रत्नागिरी, संगमेश्वरनंतर चिपळूण तालुक्यातील परशुराम, पेढे, वालापे, कळबस्त, कापसाळ, कामथे, कामथे खुर्द, कोंडमळा, सावर्डे, कासारवाडी, आगवे, असुर्डे आणि खेरशेत या गावांतील चौपदरीकरणात जाणाऱया जमीन मालकांसाठी 348 कोटी मोबदल्याची आवश्यकता असताना त्यातील 268 कोटी नुकतेच प्राप्त झाले आहेत. अजूनही 77 कोटीची आवश्यकता असल्याने तशी मागणी वरिष्ठस्तरावर करण्यात आली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सध्यस्थितीत विविध निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जमीन मालकांना केवळ नोटीसा देण्याचे काम होणार आहे. मोबदला वाटप प्रत्यक्षात एप्रिलमध्ये केले जाणार आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे निवाडे जाहीर झाल्यानंतर शंभरहून अधिक आक्षेप प्रांत कार्यालयाकडे नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये मोबदला देऊ नये इथपासून ते हिस्सेदार म्हणून नाव नोंदवण्यापर्यतच्या आक्षेपांचा समावेश आहे. त्यानुसार त्याचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर मोबदला वाटप सुरू केले जाणार असल्याचे प्रांताधिकारी सौ. कल्पना जगताप-भोसले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुळातच जिल्हय़ातील कशेडी ते सिंधुदुर्गतील झारापपर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या निविदा जाहीर करून ठेकेदारही निश्चित केलेले आहेत. मात्र जमीन मोबदला न दिल्याने ठेकेदार कंपन्या काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे चौपदरीकरणात सध्यस्थितीत खड्डे भरून रस्त्याची डागडुजीसह किरकोळ कामे सदर ठेकेदार कंपन्यांनी हाती घेतलेली आहेत. एप्रिलमध्ये जमिनीचा मोबदला वाटप झाल्यानंतर प्रत्यक्षात रस्ता चौपदरीकरणाची कामे हाती घेईपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळय़ानंतरच प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार असल्याचे चित्र सध्याच्या कार्यवाहीवरून दिसत आहे.

Related posts: